सहृदयी नेतृत्व काळाच्या पडद्याआड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 12:36 PM2024-05-23T12:36:02+5:302024-05-23T12:37:12+5:30

पी.एन. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Chief Minister Eknath Shinde Tribute to MLA P. N. Patil | सहृदयी नेतृत्व काळाच्या पडद्याआड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली

सहृदयी नेतृत्व काळाच्या पडद्याआड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली

मुंबई : कोल्हापूरमधील काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांच्या जाण्याने एक सहृदयी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. त्यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक असल्याचे मत व्यक्त करत त्यांनी पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

कोल्हापूर शहरात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या कामाच्या बळावर त्यांनी जनतेच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. एक सजग नेतृत्व, धडाडीचा लोकप्रतिनिधी, स्थानिक प्रश्नांची उत्तम जाण आणि ते सोडवण्यासाठी ते सदोदित आग्रही असायचे. शेतकऱ्यांचे प्रश्न, पुनर्वसनाचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, मागासवर्गीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा सतत माझ्याकडे पाठपुरावा सुरू असायचा. त्यांच्या जाण्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सामजिक, राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. 

कालच मला त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले होते. त्यानंतर मी तातडीने आधार रुग्णालयाचे डॉक्टर उल्हास दामले आणि डॉ. अजय केणी यांच्याशी फोनवर बोलून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. त्यानंतर त्यांचा मुलगा राहुल पाटील याच्याशी बोलून त्याला पाटील यांची प्रकृती जरा स्थिर झाल्यास त्याना एअर ऍम्ब्युलन्सने मुंबईला आणून त्यांच्यावर उपचार करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळल्याचे वेदनादायक वृत्त मला समजले. मी आणि माझा संपुर्ण शिवसेना परिवार  पी. एन. पाटील यांच्या कुटूंबियांच्या, सहकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहे. कोल्हापूरच्या रांगड्या मातीतल्या या सहृदयी नेतृत्वाला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

Web Title: Chief Minister Eknath Shinde Tribute to MLA P. N. Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.