सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री शेतकऱ्यांना विसरले : शेट्टी

By admin | Published: April 30, 2017 01:12 AM2017-04-30T01:12:51+5:302017-04-30T01:12:51+5:30

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा : २०१४ च्या निवडणुकीतील आश्वासन पंतप्रधानांनी पाळावे

Chief Minister forgot farmers after coming to power: Shetty | सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री शेतकऱ्यांना विसरले : शेट्टी

सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री शेतकऱ्यांना विसरले : शेट्टी

Next


आजरा : विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्येस सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर ३०२ कलम दाखल करा म्हणणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यानंतर मात्र शेतकऱ्यांना विसरले आहेत. तीच अवस्था पंतप्रधानांची आहे. २०१४ च्या निवडणुकीत पंतप्रधानांनी दिलेले आश्वासन पाळावे व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी आजरा येथे पत्रकार बैठकीत केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्यावतीने कर्जमुक्तीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मोटारसायकल रॅलीच्या निमित्त खा. शेट्टी बोलत होते.
खा. शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार का? असा प्रश्न मुख्यमंत्री उपस्थित करीत आहेत, पण किमान अत्यंत गांजलेल्या परिस्थितीत असणाऱ्या शेतकऱ्याला दिलासा तरी द्यावाच लागेल. सातत्याने शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचे संकट येत आहे. वैश्विक तापमानात झालेली वाढ, निसर्गाची छेड काढून उभारलेली सिमेंटची जंगले, यांच्याशी काहीही संबंध नसताना शेतकरी त्याचे परिणाम भोगत आहे. समृद्ध समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातही शेतकरी आत्महत्या करू लागला आहे. विविध कारणांनी शेतीमालाचे भाव सातत्याने कोसळत आहेत.
महाराष्ट्रातील साडेसहा लाख शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचे फॉर्म स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भरून घेतले आहेत. १२० कोटी जनतेची भूक मिटवण्याकरिता शेतात राबून देशसेवा करणाऱ्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे. त्याच्या शेतमालाला हमीभाव मिळावा व साठ वर्षे पूर्ण झालेल्या शेतकऱ्याला वृद्धापकाळात पेन्शन मिळावी, अशी आपली भूमिका आहे. तसे ठराव येत्या ग्रामसभेत महाराष्ट्राभर केले जाणार आहेत. अद्याप उसाच्या उर्वरित ५०० रुपयांचा प्रश्नही कायम आहे. चार तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून या प्रश्नाचा पाठपुरावा केला जाणार आहे. (प्रतिनिधी)


सदाभाऊ संघटना सोडणार नाहीत
राज्यमंत्री सदाभाऊ खोत भाजपच्या वाटेवर आहेत, असे समजल्याबद्दल
खा. शेट्टी यांना विचारल्यानंतर सदाभाऊ संघटनेत वाढले आहेत. ते भाजपमध्ये जातील, असे वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्षच शेतकऱ्यांच्या बाजूने
काल शेतकऱ्यांच्या बाजूने असणारे विरोधी पक्ष सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना विसरले, तर सत्तेत असणारे; परंतु सध्या विरोधात असणारे विरोधी पक्ष सत्ता गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षच नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने असतो, अशी टिप्पणीही खा. शेट्टी यांनी केली.

Web Title: Chief Minister forgot farmers after coming to power: Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.