मुख्यमंत्री यांनी साधला माणगावच्या सरपंचांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:32 AM2021-06-09T04:32:18+5:302021-06-09T04:32:18+5:30
रूकडी माणागव : कोरोना प्रतिबंधासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'राज्याचे पालक' म्हणून करत असलेल्या कामाची 'प्रेरणा' घेवूनच आम्ही आमचे ...
रूकडी माणागव : कोरोना प्रतिबंधासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'राज्याचे पालक' म्हणून करत असलेल्या कामाची 'प्रेरणा' घेवूनच आम्ही आमचे गाव निश्चितच कोरोनामुक्त करू, असा विश्वास माणगाव, ता. हातकणगंलेचे सरपंच राजू मगदूम यांनी व्यक्त केला. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य कोरोनामुक्त होण्यासाठी राज्यातील पुणे, कोकण आणि नाशिक विभागातील सरपंचांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.
संवादमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी दौलत देसाई (ऑनलाइन), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव हे सहभागी होते.
संवादामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरपंच राजू मगदूम यांच्यासह राज्यात 'कोरोनामुक्त गाव' मोहीम प्रभावीपणे राबवित असलेल्या सरपंचांच्या कामाचे कौतुक केले.
माणगाव येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही 'कोरोना दक्षता समिती'ची स्थापना केली. असून गावामध्ये येणारे सर्व रस्ते बंद केले. गावात मुख्य रस्त्यावर गेट तयार करुन कोरोना दक्षता समितीतील लोकांची नियुक्ती केली. अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत नागरिकांशिवाय अन्य नागरिकांना गावातून बाहेर पडण्यास व गावात प्रवेश करण्यास बंद केले. गावातील सर्व भागाचे निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला. गावातील सर्व डॉक्टर, औषध दुकानदार यांची बैठक घेऊन कोरोनाच्या रुग्णांना वैद्यकीय सेवा सुविधा वेळेत मिळवून देण्याबाबत विनंती केली. तसेच 'माझा वॉर्ड माझी जबाबदारी' या संकल्पनेतून ग्रामपंचायतीच्या प्रत्येक सदस्याने आपापल्या वॉर्डात घरोघरी जाऊन लक्षणे असणाऱ्या रुग्णांना तत्काळ दवाखान्यात जाण्याबाबत आवाहन केले.
गावात ३० बेडचे स्वतंत्र कोविड केअर सेंटर स्थापन करून याठिकाणी १० ऑक्सिजन बेड तयार करून घेतले. या ठिकाणी दाखल रुग्णांना आवश्यक त्या सोयी-सुविधा मिळवून देण्याची व्यवस्था केली. याबरोबरच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना असणारा धोका लक्षात घेऊन लहान मुलांसाठी १५ बेडचे स्वतंत्र कोविड सेंटर उभारून या सेंटरमध्ये १० ऑक्सिजन बेड तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती सरपंच राजू मगदूम यांनी दिली.
फोटो
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी जिल्हा परिषद दालनातून संवाद साधताना सरपंच राजू मगदूम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण मुख्यमंत्री यांनी साधला.