मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा; अन्यथा गरज पडल्यास मोर्चा काढू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:17 AM2021-06-11T04:17:24+5:302021-06-11T04:17:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात रद्द झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...
लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात रद्द झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाची भावना समजून सर्व आमदार, खासदार, आजी-माजी मंत्री,लोकप्रतिनिधी आणि सकल मराठा समाजाचे समन्वयक व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून अंतिम निर्णय घ्यावा. अन्यथा गरज पडल्यास सरकार विरोधात मोर्चा काढण्याची तयारी आहे. असा सूर सकल मराठा समाजाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत उमटला.
आरक्षणासंबंधी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरातील केंद्रीय कार्यालयात राजकीय पक्ष, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
खासदार संभाजीराजे यांनी रविवारी (दि.६) रोजी अभिषेक दिनाचे औचित्य साधून रायगडावरून आरक्षणाच्या लढाईची घोषणा केली. त्यानुसार समाजाने ही तयारी केली आहे. जिल्ह्यासह राज्यातील लोकप्रतिनिधी, उद्योजकांसह अन्य पदाधिकाऱ्यांची त्यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांसोबत अंतिम बैठक घ्यावी, असे मत शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी बैठकीच्या सुरुवातीला मांडले.
महेश जाधव म्हणाले, आरक्षण न मिळाल्याने समाज आक्रमक असून मोर्चा काढून सरकारला जाग आणावी.
माजी महापौर आर. के. पोवार म्हणाले, महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक संभाजीराजेंच्या उपस्थित बोलवावी. राष्ट्रवादी पक्ष मराठा आंदोलनासाठी रस्त्यावरही येण्यास तयार आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार म्हणाले, लढाई जिंकण्यासाठी आपल्यात दुफळी नको. आरक्षण मिळण्यासाठी समन्वयकांसोबत बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करू.
माजी नगरसेवक अजित राऊत, रविकिरण इंगवले, सचिन तोडकर, जयकुमार शिंदे, बाबा पार्टे, निवास साळोखे, सुरेश जरग यांनीही मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, खासदार संभाजीराजे जी भूमिका घेतील त्यास सकल मराठा समाजाचा पाठिंबा राहील. गरज पडल्यास १६ जूनचा मोर्चा काढण्याचीही तयारी समाजाने केली आहे. तरी मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न कोणत्याही मार्गाने सुटावा. यासाठी सर्व पक्ष, लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे, असेही आवाहन सर्व उपस्थित मान्यवरांनी केले.
यावेळी रवींद्र साळुंखे, संजय पडवळे, सुहास साळुंखे, शिवाजीराव चव्हाण, हर्षल सुर्वे, अॅड. राजेंद्र पाटील, महेंद्र चव्हाण, वीरेंद्र मंडलिक, शिवाजीराव जाधव, लालासाहेब गायकवाड, राजू जाधव, दिलीप पाटील, हिंदूराव घाडगे, अर्जुन नलवडे, युवराज उलपे आदी उपस्थित होते.
किरकोळ वादावादी
माजी नगरसेवक अजित राऊत यांनी कोणाच्या काळात मोर्चा काढणे उचित ठरणार नाही, असे मत व्यक्त केले. त्यावर शाहीर दिलीप सावंत यांनी खासदार संभाजीराजे यांनी १६ जूनला आंदोलनाची हाक दिली आहे. मोर्चाची नव्हे. यावरून दोघांमध्ये वादावादी झाली.
फोटो :१००६२०२१कोल - शिवाजी पेठ
ओळी : मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात गुरुवारी आयोजित केलेल्या बैठकीत सुजित चव्हाण बोलत होते.