मुख्यमंत्र्यांनी सन्माननीय तोडगा काढावा, प्राध्यापकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 05:45 PM2018-10-04T17:45:09+5:302018-10-04T17:52:41+5:30
शासनाचे प्रमुख या नात्याने आता मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन कामबंद आंदोलनाबाबत सन्माननीय तोडगा काढावा, अशी मागणी प्राध्यापकांनी गुरुवारी येथे केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (दि. ३) उच्च शिक्षणाशी संबंधित असलेल्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्याबद्दल राज्य सरकारचा प्राध्यापकांनी गुरुवारी निषेध केला.
कोल्हापूर : शासनाचे प्रमुख या नात्याने आता मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन कामबंद आंदोलनाबाबत सन्माननीय तोडगा काढावा, अशी मागणी प्राध्यापकांनी गुरुवारी येथे केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (दि. ३) उच्च शिक्षणाशी संबंधित असलेल्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्याबद्दल राज्य सरकारचा प्राध्यापकांनी गुरुवारी निषेध केला.
येथील टाऊन हॉल बागेत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघातर्फे (सुटा) सभा घेण्यात आली. यावेळी एम्फुक्टोचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुभाष जाधव म्हणाले, सरकारकडून शिक्षक आणि शिक्षणाच्या प्रश्नांबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले जाते; पण ती सकारात्मकता शासनाच्या कृतीमध्ये दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी अधिक वेळ न घालविता प्राध्यापकांच्या आंदोलनप्रश्नी सन्माननीय तोडगा काढण्यासाठी एम्फुक्टोबरोबर चर्चा करावी.
सुटाचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्रा. सुधाकर मानकर म्हणाले, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्राध्यापकांच्या मागण्यांबाबत तोडगा काढलेला नाही. आता शासनाचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. या सभेत डॉ. डी. एन. पाटील, अरुण पाटील, आबासाहेब चौगले यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, सुटातर्फे शुक्रवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याची सुरुवात टाऊन हॉल बागेतून होणार आहे.
विविध संस्थांचा पाठिंबा
या आंदोलनाला विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, विविध संस्था आणि त्यांचे पदाधिकारी, प्रतिनिधी पाठिंबा देत आहेत. टाऊन हॉल बागेतील सभेला गुरुवारी युवा प्रतिष्ठानच्या वतीने विरेंद्र मंडलिक यांंनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला असल्याचे प्रा. जाधव यांनी सांगितले.