आम्ही लाडक्या बहिणी नाही का?, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सवाल; कोल्हापूर जिल्हा परिषदेवर मोर्चा
By समीर देशपांडे | Published: July 15, 2024 03:57 PM2024-07-15T15:57:46+5:302024-07-15T15:59:54+5:30
कोल्हापूर : मुख्यमंत्री साहेब, आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी नाही का? असा सवाल अंगणवाडी सेविकांनी सोमवारी उपस्थित केला. विविध ...
कोल्हापूर : मुख्यमंत्री साहेब, आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी नाही का? असा सवाल अंगणवाडी सेविकांनी सोमवारी उपस्थित केला. विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर सोमवारी दुपारी मोर्चा घेवुन आलेल्या या कर्मचाऱ्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. अतुल दिघे आणि सुवर्णा तळेकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
आशाची मानधनवाढ होताच तितक्याच मानधनवाढीचा प्रस्ताव मंत्रीमंडळात ठेवून मानधन वाढ करणे, सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी पेन्शनयोजना सुरू करणे, सर्व अंगणवाडी सेविकांना उपदान ग्रॅच्युईटी लागू करणे याबाबत कारवाई अद्यापही पूर्ण झालेली नाही. ती कार्यवाही करावी, वेतन लागू करण्यासंबंधीची चर्चा कृती समिती सोबत चर्चा करावी अशा विविध मागण्या यावेळी मोर्चेकऱ्यांनी केले.
दिघे म्हणाले, जानेवारी ते मार्च असा प्रदीर्घ संप केल्यानंतर ५ हजार रूपये मानधन वाढ मिळाली. परंतू उर्वरित मागण्यांबाबत लोकसभेची आचारसंहिता लाभल्यानंतर मंत्री आदित तटकरे यांनी बैठक बोलावून उरलेल्या मुद्यांबाबत संघटनांशी चर्चा करणे आवश्यक होते. परंतू त्यांना वेळ मिळालेला नाही. याबाबत जर निर्णय झाला नाही तर लाडकी बहिण योजनेच्या कामावरही बहिष्कार घालण्यात येईल. यावेळी ‘भाजीत भाजी अंबाडी, सरकार करतंय लबाडी’यासारख्या घोषणा देण्यात आल्या.