कौशल्य विकासावरच देश महासत्ता : मुख्यमंत्री
By Admin | Updated: July 20, 2014 23:18 IST2014-07-20T23:13:01+5:302014-07-20T23:18:41+5:30
सौदी अरेबिया, चीन, रशिया, अमेरिका यांच्याकडे नैसर्गिंक संपत्ती आहे. त्यामुळे ते प्रगतिपथावर आहेत.

कौशल्य विकासावरच देश महासत्ता : मुख्यमंत्री
कऱ्हाड : ‘देशाकडे नैसर्गिक संपत्ती नसल्याने सुमारे ८५ टक्के कच्चे तेल, कोळसा तसेच अनेक खनिजे आयात करावी लागत आहेत. सौदी अरेबिया, चीन, रशिया, अमेरिका यांच्याकडे नैसर्गिंक संपत्ती आहे. त्यामुळे ते प्रगतिपथावर आहेत. देश आर्थिक महासत्ता होण्यासाठी मनुष्यबळ व कौशल्य विकास वाढविणे गरजेचे आहे. तसेच रोजगार वाढविण्यासाठी ‘नॅशनल स्किल डेव्हपमेंट कार्पोरेशन’ची स्थापना करणार आहे,’ अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान व मुलींच्या वसतिगृहाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांंच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. गृहराज्यमंत्री सतेज पाटील, नियामक मंडळ सदस्य शहाजीराव जगदाळे, आमदार आनंदराव पाटील, धैर्यशील कदम, जिल्हाधिकारी रामास्वामी एन., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बांगर, बाजार समितीचे उपसभापती सुनील पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘देश आर्थिक महासत्ता होण्यासाठी मनुष्यबळाचा वापर करणे गरजेचे आहे. जपानकडे कोणतीही नैसर्गिक संपत्ती नाही. तरीही मनुष्यबळ व कौशल्याच्या विकासावर आज तो देश समृद्ध आहे. आर्थिक ताकद त्यांनी निर्माण केली आहे. इस्त्राइलने मनुष्यबळावरच प्रगती केली आहे. तेथील लोकसंख्या सातारा जिल्ह्याइतकीच म्हणजे ४० लाख आहे. दरडोई उत्पन्न वाढविले तर सर्व समस्या सोडवण्यास मदत होईल. शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढविणे गरजेचे आहे. त्याचा राष्ट्र निर्माणासाठी उपयोग होणार आहे. सध्या उच्च शिक्षणाकरिता जादा निधी देऊ शकत नाही. प्राथमिक शिक्षणासाठी ३० हजार कोटींहून अधिक खर्च होत आहे. सध्या देशाला मूलभूत गोष्टीसाठीच जास्ती संघर्ष करावा लागत आहे. यामुळे संशोधनावर जास्तीतच भर देऊन संशोधनावर आधारित नवे उद्योग निर्माण होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात साक्षरतचे प्रमाणे ८५ टक्क्यांहून अधिक आहे. महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी जास्तीत जास्त उत्पादन क्षमता वाढविणे गरजेचे आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या जिल्ह्यांतूनच सुमारे ७५ टक्के उत्पन्न महाराष्ट्राला मिळते. यामुळे उत्पादन क्षमता ही वाढविणे गरजेचे आहे.’ (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या इंजिनिअर ते राजकीय प्रवासाबाबत प्रश्न विचारला. याला मुख्यमंत्र्यांनी प्राथमिक शिक्षणापासून आजपर्यंतच्या राजकीय प्रवासाबाबतचे सविस्तर उत्तर दिले. तसेच राज्यात विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्येबाबत राज्य शासनाची भूमिका विचारण्यात आली. यावर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसमोर असणारी ताण-तणावाची परिस्थिती कारणीभूत असल्याचे सांगितले.