जैन महामंडळासाठी मुख्यमंत्री आढावा बैठक घेणार - ललित गांधी; अहवाल सादर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 14:20 IST2025-01-06T14:19:30+5:302025-01-06T14:20:08+5:30
जैन समाजासाठी असे स्वतंत्र महामंडळ स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य

जैन महामंडळासाठी मुख्यमंत्री आढावा बैठक घेणार - ललित गांधी; अहवाल सादर
मुंबई / कोल्हापूर : जैन समाजाच्या धार्मिक, सामाजिक सुरक्षितता व गरजू लोकांच्या आर्थिक सक्षमतेसाठी महाराष्ट्र सरकारने नव्याने स्थापन केलेल्या जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे कामकाज गतिमान व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक बोलावण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
जैन समाजासाठी असे स्वतंत्र महामंडळ स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असून महामंडळाचे कामकाज प्रभावीपणे सुरू होऊन समाजातील प्रत्येक पात्र व्यक्तिपर्यंत याचे लाभ पोहोचले पाहिजेत, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. अध्यक्ष ललित गांधी यांनी मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन महामंडळाचा अहवाल सादर केला. यावेळी आढावा बैठक घेण्याची विनंती त्यांनी केली. फडणवीस यांनी आढावा बैठक घेण्यास मान्यता देऊन तशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीस अल्पसंख्याक कार्य मंत्री दत्तात्रय भरणे, अल्पसंख्याक कार्य राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह सामान्य प्रशासन, वित्त विभागाचे प्रधान सचिव नियोजन, अल्पसंख्याक कार्य विभागाचे सचिव, अल्पसंख्याक कार्य विभागाचे सहसचिव, जैन समाज आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक, सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. ललित गांधी यांनी अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव रूचेश जयवंशी, सहसचिव मो. बा. तासीलदार, व्यवस्थापकीय संचालक जी. पी. मगदूम यांच्यासोबत बैठक घेत पहिल्या १०० दिवसाचा कृती आराखडा सादर करण्यासंबंधी चर्चा केली.