मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला कोल्हापूर जिल्ह्यातील माणगावच्या सरपंचांशी संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 10:15 PM2021-06-07T22:15:57+5:302021-06-07T22:18:55+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेतून गावाचे 'पालक' बनून 'गाव कोरोना मुक्त' करणार; सरपंच राजू मगदूम यांनी व्यक्त केला विश्वास
कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधासाठी मुख्यमंत्री 'राज्याचे पालक' म्हणून करत असलेल्या कामाची 'प्रेरणा' घेवूनच आम्ही आमचे गाव निश्चितच कोरोनामुक्त करु, असा विश्वास हातकणंगले तालुक्यातील माणगावचे सरपंच राजू आप्पासो मगदूम यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर जिल्हा परिषदेमधून सरपंच राजू मगदूम यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना कोरोना प्रतिबंधासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी दौलत देसाई(ऑनलाइन), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, कसबा सांगाव(ता.कागल) चे सरपंच रणजित जयसिंग कांबळे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरपंच राजू मगदूम यांच्यासह राज्यात 'कोरोना मुक्त गाव' मोहीम प्रभावीपणे राबवित असलेल्या सरपंचांच्या कामाचे कौतुक केले. सरपंच ही राज्याची पाळेमुळे असून राज्याचा वटवृक्ष बहरण्यासाठी सरपंचांचे योगदान महत्वपूर्ण आहे. प्रत्येक गावच्या सरपंचांनी आपापल्या गावचे पालकत्व घेवून सर्वजण मिळून लवकरात लवकर राज्य कोरोनामुक्त करुया, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. कोरोना मुक्त गाव' मोहिमेत गावातील महिलांचा सहभाग महत्वाचा असल्याचे सांगून ही मोहीम लोकचळवळ बनवी, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पहिली लाट ओसरल्यानंतर आपण थोडेसे गाफील राहिलो. त्यामुळे दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागाला मोठा फटका बसला. आता तिसरी लाट येणार नाही, यासाठी सर्व पातळ्यांवर कार्यवाही करणे गरजेचे आहे. लसीकरणाचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण होईल यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा. म्युकरमायकोसिसचे नवीन आव्हान आपल्यासमोर आले आहे. यालाही रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा. हिवरेबाजार च्या धर्तीवर सर्व सरपंचांनी पुढाकार घेऊन आपापले गाव कोरोनामुक्त करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सरपंच राजू मगदूम म्हणाले, माणगाव (ता.हातकणंगले) मधील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही 'कोरोना दक्षता समिती'ची स्थापना केली. गावामध्ये येणारे सर्व रस्ते बंद केले. गावात मुख्य रस्त्यावर गेट तयार करुन कोरोना दक्षता समितीतील लोकांची नियुक्ती केली. अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत नागरिकांशिवाय अन्य नागरिकांना गावातून बाहेर पडण्यास व गावात प्रवेश करण्यास बंद केले. गावातील सर्व भागाचे निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला. गावातील सर्व डॉक्टर, औषध दुकानदार यांची बैठक घेऊन कोरोनाच्या रुग्णांना वैद्यकीय सेवा सुविधा वेळेत मिळवून देण्याबाबत विनंती केली. गावातील बाधित रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मोफत स्वतंत्र रुग्णवाहिकेची सोय केली.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गावात दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन करुन निर्बंध लागू केले. विना मास्क व विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांच्या घरफाळ्यामध्ये वीस टक्के दंडाची आकारणी केली. तसेच याबाबत नागरिकांना 'ग्रामपंचायत तक्रार निवारण ग्रुप' द्वारे व सोशल मीडियावरील व्हाट्स ऍप ग्रुप द्वारे कळवले, यामुळे नागरिकांचे विनाकारण घराबाहेर पडणे बंद झाले. ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे गावातील लोकांना लसीकरण मोहीम, बाधित नागरिक, बाधितांची संख्या, घ्यावयाची खबरदारी याबाबत माहिती दिली.
'माझा वॉर्ड माझी जबाबदारी' मोहीम चांगल्या प्रकारे राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. जो प्रभाग कोरोना मुक्त असेल किंवा कमीत कमी रुग्णसंख्या असेल तसेच 45 व 60 वयावरील नागरिकांचे लसीकरण, असे निकष पाहून कोरोना प्रतिबंध करणाऱ्या प्रभागांना गाव पातळीवर विकास निधी देण्याचे जाहीर केले. तसेच 'माझा वॉर्ड माझी जबाबदारी' या संकल्पनेतून ग्रामपंचायतीच्या प्रत्येक सदस्याने आपापल्या वॉर्डात घरोघरी जाऊन लक्षणे असणाऱ्या रुग्णांना तात्काळ दवाखान्यात जाण्याबाबत आवाहन केले, तसेच त्यांना वेळेत औषधोपचार व कोविड केअर सेंटरमध्ये बेड मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. याबरोबरच नागरिक बाधित झाल्यास त्यांनी घाबरु नये, यासाठी प्रबोधन करण्यात आले.
गावात 30 बेडचे स्वतंत्र कोविड केअर सेंटर स्थापन करून याठिकाणी 10 ऑक्सिजन बेड तयार करून घेतले. याठिकाणी दाखल रुग्णांना आवश्यक त्या सोयी-सुविधा मिळवून देण्याची व्यवस्था केली. याबरोबरच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना असणारा धोका लक्षात घेऊन लहान मुलांसाठी 15 बेडचे स्वतंत्र कोविड सेंटर उभारून या सेंटरमध्ये 10 ऑक्सिजन बेड तयार करण्यात आले आहेत. वैद्यकीय सोयी-सुविधां बरोबरच लहान मुलांच्या मनोरंजनासाठी डिजिटल बॅनरच्या माध्यमातून विविध कार्टून, पशु- पक्षी, प्राण्यांची चित्रे, अंक गणिते तयार करून घेतली आहेत.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध उपाय-योजना राबवून गाव कोरोना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती सरपंच राजू मगदूम यांनी दिली. मुख्यमंत्री महोदय यांचे प्रोत्साहन, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे वेळोवेळी मिळणारे सहकार्य तसेच लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी दौलत देसाई व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या सहकार्याने माणगाव सह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व गावे लवकरच कोरोना मुक्त होतील, असा विश्वास सरपंच राजू मगदूम यांनी यावेळी व्यक्त केला.