मराठा आरक्षण: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संभाजीराजे यांच्याशी आज करणार चर्चा; शरद पवारांचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 09:13 AM2022-02-28T09:13:06+5:302022-02-28T09:19:22+5:30
उपोषण मागे घेण्याची शक्यता.
विश्वास पाटील
कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी शनिवारपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणास बसलेल्या खासदार संभाजीराजे यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सोमवारी (दि २८) चर्चा करणार आहेत. त्यामुळे हे बेमुदत उपोषण मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. त्याला कोल्हापूरसह राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. कोल्हापूरात दसरा चौकात साखळी उपोषण सुरू असून ठिकठिकाणी रास्ता रोको, बंदचे आवाहन करण्यात येत आहे. समाजाच्या प्रश्नांसाठी कोणतरी रस्त्यावर उतरत आहे. त्याला पाठबळ दिले पाहिजे या भावनेतून लोक त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आहेत.
या पार्श्वभूमीवर रविवारी या आंदोलनातून तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. त्याचे केंद्र अर्थातच कोल्हापूर राहिले. छत्रपती घराण्याचे निकटवर्ती आणि जेष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू व्ही.बी.पाटील यांची यातून कसा तोडगा काढता येईल यासंबंधी छत्रपती शाहू महाराज यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर ही चर्चा पाटील यांनी पवार यांच्या कानांवर घातली. तेवढ्यावरच हा विषय थांबला नाही. पवार यांच्या सुचनेवरून तातडीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे रविवारीच आझाद मैदानावर जाऊन संभाजीराजे यांना भेटले व त्यांच्याशी चर्चा केली.
पवार हे दिवसभरात शाहू छत्रपती यांच्याशी दोनवेळा बोलले. त्या चर्चेच्या आधारे नंतर पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातही संभाजीराजे यांच्या मागण्यांबद्धल चर्चा झाली. त्यांनी केलेल्या मागण्या मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यातील कांही विषय राज्यपाल यांच्या पातळीवर प्रलंबित आहेत. केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यपालही मराठा आरक्षणासह अनेक प्रश्नांवर राज्य सरकारची शक्य तितकी कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत संभाजीराजे यांनीही भाजपचा राजकीय फायदा होईल अशी कोणतीही कृती करू नये अशी विनंती त्यांना करण्यात आली.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी मुख्यमंत्री ठाकरे हे संभाजीराजे यांच्याशी चर्चा करणार आहेत. मराठा समाजाच्या प्रश्नांसंदर्भात कांही ठोस आश्वासन त्यांच्याकडून अपेक्षित आहे. हे झाल्यानंतर संभाजीराजे आंदोलन मागे किंवा स्थगित करत असल्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
शाहू महाराज केंद्रस्थानी
रविवारी दिवसभर जेष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे, मंत्री वळसे पाटील यांची भेट या सर्व घडामोडीच्या केंद्रस्थानी शाहू छत्रपत्री हे राहिले. या सर्वांना एकत्र आणण्याची भूमिका व्ही.बी.पाटील यांनी पडद्याआड सूत्रे हलवून पार पाडली.