मुख्यमंत्री येडीयुरप्पा पुन्हा कोरोनाग्रस्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:24 AM2021-04-17T04:24:57+5:302021-04-17T04:24:57+5:30
‘आज मला हलकासा ताप आल्यानंतर मी माझी कोरोना तपासणी केली आणि या तपासणीत मला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले ...
‘आज मला हलकासा ताप आल्यानंतर मी माझी कोरोना तपासणी केली आणि या तपासणीत मला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. माझी प्रकृती उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यावरून मला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले आहे. तेव्हा अलीकडच्या काळात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी. तसेच स्वतःला क्वारंटाईन करून घ्यावे, अशी विनंती आहे’, असे ट्वीट मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी केले आहे.
लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी बेळगावला आलेल्या मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांना गुरुवारी ताप आणि थकव्यामुळे प्रचार दौरा अर्ध्यावर आटोपता घ्यावा लागला होता. तत्पूर्वी बुधवारी रात्री त्यांची शहरातील खासगी रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. बेळगाव आणि हुक्केरी येथे त्यांनी रोड शो देखील केला होता. मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अंगातील ताप वाढल्याने मुख्यमंत्र्यांना एम. एस. रामय्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या स्वॅबचा नमुना पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांना अधिक उपचारासाठी तात्काळ मणिपाल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी मागील महिन्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता आणि येत्या काही दिवसात ते दुसरा डोस घेणार होते.