मुख्यमंत्र्यांची आश्वासने हवेतले गोळीबार
By admin | Published: September 11, 2015 10:53 PM2015-09-11T22:53:44+5:302015-09-11T23:41:52+5:30
नारायण राणेंनी डागली तोफ : मालवण विकास आराखडा माथी मारू दिला जाणार नाही
मालवण : मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. या भागाचा आपण दौरा केल्यानंतर जागे झालेल्या मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ दौरा केला. मात्र, दुष्काळग्रस्तांना जाहीर झालेली मदत अद्याप पोहचलेली नाही. मुख्यमंत्र्यांची आश्वासने ही केवळ हवेतले गोळीबार आहेत, अशी टीका करताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजप, सेना सरकावर तोफ डागली.
सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेल्या राणे यांनी मालवण नीलरत्न निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, नगराध्यक्ष अशोक तोडणकर, लीलाधर पराडकर, दीपक पाटकर, संतोष आचरेकर, आबा हडकर, संजय लुडबे, राजू परुळेकर आदी यावेळी उपस्थित होते.भाजप सत्तेत आल्यापासून धार्मिक व जातीय तेढ निर्माण करण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. असे सांगत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. निष्पाप लहान मुलांचे सोयी सुविधांअभावी जीव जात आहेत. विकासाचे प्रकल्प शासनाने बासनात गुंडाळले की काय, अशी स्थिती आहे.
मालवणवासीयांचा प्रखर विरोध होत असलेल्या शहर विकास आराखड्याबाबत भाष्य करताना भाजपकडून गैरसमज पसरवले जात आहेत, असे सांगत नगरविकास खात्यांतर्गत टाऊन प्लॅनिंग तयार केलेल्या या आराखड्यावर अभ्यास करून पालकमंत्र्यांनी स्थानिकांना विश्वासात घेणे गरजेचे होते. त्यानंतरच आराखडा प्रसिद्ध झाला असता तर नागरिकांवर अन्याय झालाच नसता. हा आराखडा नगरपालिकेत पुन्हा मांडला जाईल, त्यावेळी काँग्रेस नगरसेवक जनतेला अपेक्षित असा आराखड्यास विरोध करतील. कोणत्याही स्थितीत नागरिकांना उद्ध्वस्त, विस्थापित लेले जाणार नाही. शासन स्तरावर जरी हा आराखडा मंजुरीस गेल्यास आपण स्वत: लक्ष घालून आराखड्यास विरोध करू, असे राणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
वाँटेड आमदार
आमसभा कशी घेतो ?
अनधिकृत वाळू डंपरमध्ये भरताना सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी आमदार वैभव नाईक यांच्यावर चार महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला. मात्र, अद्यापही अटक झाली नाही. अशा वाँटेड आमदाराला पोलीस सभा घेऊच कशी देतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अन्य धर्मियांवर अन्याय का ?
मुंबईत मांसाहार बंदी घातली आहे. याबाबत बोलताना कोणत्याही धर्मासाठी अन्य धर्मियांवर बंधने योग्य नाहीत. भाजपा-शिवसेनेची मंडळी आरोप-प्रत्यारोप करून जणू करमणूकच करत आहेत, असे सांगताना भाजप सत्तेत आल्यापासून धार्मिक व जातीय वाद वाढला आहे. जातीय वादातून तेढ निर्माण करणे हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे, असे राणे म्हणाले.
भुयारी गटार निधीबाबत अर्थमंत्र्यांना पत्र पाठवा
मालवणच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची अशी भुयारी गटार योजना ७० टक्के पूर्ण झाली आहे. मात्र, केंद्र्राकडून उर्वरित निधी न मिळाल्याने ही योजना बंद आहे. याबाबत लक्ष वेधले असता अर्थमंत्र्यांना निधीबाबत नगरपरिषदेने पत्रव्यवहार करावा अशा सूचना नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांना केल्या. आपण स्वत: या प्रकरणी लक्ष घालणार असल्याचे सांगितले, केंद्राने सर्वच लोकहिताच्या जुन्या योजना बंद केल्या, हेच का ‘अच्छे दिन’, असा टोलाही राणे यांनी लगावला.