मुख्यमंत्र्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली असती

By admin | Published: February 8, 2016 11:12 PM2016-02-08T23:12:00+5:302016-02-08T23:56:50+5:30

हसन मुश्रीफ : टोलबाबत अजूनही कोल्हापूर महानगरपालिकेवर टांगती तलवार

Chief Minister's elephant would have procured a procession | मुख्यमंत्र्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली असती

मुख्यमंत्र्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली असती

Next

कोल्हापूर : ‘आयआरबी’ कंपनीने टोलबाबत महापालिका विरोधातील याचिका मागे घेतलेली नाही. त्यांना ही तडजोड मान्य आहे की नाही, त्याचबरोबर कंपनीला अद्याप पैसे न दिल्याने महापालिकेवर टोलची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे टोलचा प्रश्न खऱ्या अर्थाने संपला कोठे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकारांशी केला. टोलबाबतचे सर्व प्रश्न सोडविले असते तर मुख्यमंत्र्यांसह संबंधित दोन मंत्र्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली असती. त्यांनी सत्कार करून घेण्यास जरा गडबड केल्याचा टोलाही मुश्रीफ यांनी मारला.
कोल्हापुरातील टोलबाबत ‘आयआरबी’ कंपनीने महापालिकेवर न्यायालयात दावा केला आहे. राज्य सरकारने जरी कंपनीशी तडजोड करून रक्कम देण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप कंपनीने कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
कंपनीने न्यायालयातून याचिका मागे घेतलेली नाही. कंपनीचे पैसे देण्याची केवळ घोषणा केली आहे, पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्कार करून घेण्यास जरा गडबड केली. त्यांनी हे सर्व प्रश्न मार्गी लावले असते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांची हत्तीवरून मिरवणूक काढली असती. त्याचबरोबर निवासराव साळोखे व बाबा पार्र्टे यांचाही जंगी सत्कार केला असता, असेही आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.
विधी आणि न्याय खात्याचा मंत्री असताना न्यायसंकुलाच्या मंजुरीसह प्रत्येक टप्प्यावर निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला; पण सर्किट बेंचसाठी बार असोसिएशनने बहिष्कार टाकल्याने आम्ही उपस्थित राहू शकलो नसल्याचा खुलासाही त्यांनी केला. (प्रतिनिधी)


टोलचा विषय संपलाच : निवासराव साळोखे
कोल्हापूर महानगरपालिकेवर ‘आयआरबी’ कंपनीच्या टांगत्या तलवारीची भीती वाटणाऱ्यांनीच ही तलवार टांगून ठेवली आहे. टोल प्रकरणातील आपले काळं कर्तृत्व दडपण्यासाठीच हसन मुश्रीफ पांढरा प्रयत्न करत आहेत. ‘आयआरबी’ कंपनीशी राज्य सरकारने चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याने टोलचा प्रश्न संपला आहे.


मिरवणुकीसाठी वेगळा मुहूर्त कशाला
टोल कोल्हापूरकरांच्या अस्मितेचा विषय होता, तो दूर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंगराएवढे काम केले आहे. खिलाडूवृत्तीने ते स्वीकारलेच पाहिजे. टोलविरोधी कृती समितीच्या मागे आहोत, हत्तीवरून मिरवणूक काढली असती, हे हसन मुश्रीफ यांचे वाक्प्रचार गुळगुळीत झाले आहेत. हत्तीवरून मिरवणूक काढायचीच होती, तर वेगळा मुहूर्त शोधण्याची गरज काय? असा सवालही निवासराव साळोखे यांनी केला.

Web Title: Chief Minister's elephant would have procured a procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.