उपहासात्मक पुरस्काराने मुख्यमंत्र्यांचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:25 AM2018-06-22T00:25:13+5:302018-06-22T00:25:13+5:30
कोल्हापूर : गेल्या चार वर्षांतील भाजप सरकारच्या कारभाराचा पोलखोल करीत राष्टÑवादी काँग्रेसतर्फे गुरुवारी उपहासात्मक पुरस्काराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव आंदोलन करीत प्रतीकात्मक मुख्यमंत्र्यांना ‘आऊटस्टँडिंग चीफ मिनिस्टर’ पुरस्काराचे उपमहापौर महेश सावंत यांच्या हस्ते व राष्टÑवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आदींसह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत वितरण करण्यात आले.
दुपारी बाराच्या सुमारास प्रतीकात्मक मुख्यमंत्री रामेश्वर पतकी यांच्या वाहनांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आला. गाडीतून उतरताना कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले. आंदोलनस्थळी व्यासपीठावर आमदार मुश्रीफ, खासदार महाडिक, उपमहापौर महेश सावंत, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष राजेश लाटकर, आर. के. पोवार, भैया माने, युवराज पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.
नेत्यांची भाषणे सुरू असताना प्रतीकात्मक मुख्यमंत्र्यांना भेटून विविध प्रश्नांची निवेदने लोकांकडून दिली जात होती. त्यावर प्रतीकात्मक मुख्यमंत्री स्मितहास्य करून निवेदनावर सही करून ते पाठीमागे उभ्या असलेल्या पी.ए.कडे देत होते. मुख्यमंत्र्यांना नुकताच अमेरिकेत ‘आऊटस्टॅँडिंग लीडरशिप इन डेव्हलपमेंट’ हा पुरस्कार दिला. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी गेल्या चार वर्षांत त्यांनी मराठा, लिंगायत, मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण कायम केले. पेट्रोल, डिझेल दरवाढ करून नागरिकांना दिलासा दिला, आदी महत्त्वपूर्ण निर्णयांबद्दल प्रतीकात्मक मुख्यमंत्र्यांना ‘आऊटस्टँडिंग चीफ मिनिस्टर’ हा उपहासात्मक पुरस्कार दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिमा असलेले स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
एवाय आणि मुख्यमंत्री
‘दादां’समवेत ज्यांनी अनेक वेळा माझी भेट घेतली, ते ए. वाय. पाटील... असे प्रतीकात्मक मुख्यमंत्र्यांनी म्हणताच उपस्थितांमधून टाळ्या आणि हास्याचे फवारे उडाले. ए. वाय. पाटील यांच्या भाजप प्रवेशासाठी तो टोमणा होता.
पालकमंत्र्यांचे अभिनंदन
भाजप व शिवसेना एकत्र न आल्यास कॉँग्रेस-राष्टÑवादीची सत्ता येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले आहे. ते अध्यात्मवादी असून, त्यांना भविष्य कळून दृष्टांत झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन असून, याबद्दल त्यांना साखर भरवू, असा टोला मुश्रीफ यांनी हाणला.
...तर राष्टÑवादीची माफी
विकासाची, दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्याबाबत अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांना उपहासात्मक पुरस्कार देऊन केलेल्या आंदोलनातील एकही मुद्दा चुकीचा असल्यास राष्टÑवादी माफी मागण्यास तयार असल्याचे आव्हान आमदार मुश्रीफ यांनी दिले.