शाहूविचार संपविण्यासाठीच मुख्यमंत्र्यांचा कोल्हापुरात मुक्काम, विजय वड्डेटीवार यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 11:58 AM2024-05-06T11:58:54+5:302024-05-06T12:00:27+5:30
'जुमलेबाज सरकारला जनता कंटाळली'
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री चार-चार दिवस कोल्हापुरात मुक्काम करत आहेत. त्यांना शाहू महाराजांच्या विचारांची इतकी भीती का आहे. ते शाहू महाराजांचे विचार संपविण्यासाठीच चार चार दिवस कोल्हापुरात मुक्काम करत आहेत. मात्र, शाहूंचा विचार मारण्यासाठी चार काय ४० दिवस थांबले तरी येथील जनता शाहू विचारांनाच बळ देईल, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी केला.
राज्यात महाविकास आघाडीला चांगले वातावरण असून, किमान ३८ जागा जिंकू, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, जुमलेबाज सरकारला जनता कंटाळली आहे. त्यामुळे ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांना भीत आहेत. त्यांच्या प्रत्येक भाषणात काँग्रेसचा २५ वेळा उल्लेख केला जात असून, आमच्या जाहीरनाम्याचे पंतप्रधानच प्रचारक आहेत. भ्रष्टाचारी लोकांना नवीन मंडप घालून आपल्या जवळ बसवून घेत आहेत.
आमच्या खिडक्या काढून नेल्या..
भाजपने राष्ट्रवादी, शिवसेनेची घरे फोडली. आमच्याही नांदेडसारख्या काही खिडक्या काढून नेल्या. पण, यामुळे आमचे घर उघडे पडले नाही. उलट कोल्हापुरातील शोभिवंत खिडकीमुळे आमच्या घराचे सौंदर्य अधिक वाढेल, या शब्दांत वडेट्टीवार यांनी अशोक चव्हाण यांना टोला लगावला. सांगलीत विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाला. पण, आघाडी धर्मामुळे ती जागा शिवसेनेला दिली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आमचे काम असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्याची चौकशी व्हावी
हेमंत करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने झाला नव्हता. ती गोळी कुणाची होती, याची चौकशी व्हायला हवी. ही बाब ॲड. उज्ज्वल निकम यांनी का निदर्शनास आणून दिली नाही, हा माझा सवाल होता. एस. एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देत मी हे वक्तव्य केले होते. कसाबला फाशी देण्याचे आम्ही श्रेय घेणार नाही. त्याला फाशी होणारच होती. पण करकरे यांना लागलेली गोळी कोणाची होती हे शोधा, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.