मुख्य संशयित मनीष नागोरी याला अटक

By admin | Published: November 3, 2016 12:46 AM2016-11-03T00:46:48+5:302016-11-03T00:46:48+5:30

खुनाची सुपारी : वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी लाहोरियाची सुपारी; नागोरीचा खुलासा

Chief suspect Manish Nagori arrested | मुख्य संशयित मनीष नागोरी याला अटक

मुख्य संशयित मनीष नागोरी याला अटक

Next

 इचलकरंजी : दोन महिन्यांपूर्वी नवी मुंबई येथील बांधकाम व्यावसायिकाच्या खुनाची सुपारी घेतल्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व आंतरराज्य पिस्तुल तस्कर मनीष नागोरी याला बुधवारी शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील स्वप्निल फातले याला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, आर्थर रोड जेलमध्ये असलेला बिल्डर सुरेश बिजलानी याच्या खुनाची सुपारी मनीष नागोरी याने घेतली होती. त्याने ही कामगिरी स्वप्निल फातले याच्यावर सोपविली होती. पण २६ सप्टेंबर रोजी शहापूर पोलिसांनी संशयावरुन फातले याला ताब्यात घेतले असता हे प्रकरण उघडकीस आले होते. तर नागोरी हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. तेव्हापासून फरार असलेल्या संशयित मनीष नागोरीचा पोलिस शोध घेत होते. मनीष नागोरी हा एका गुन्ह्यात ठाणे कारागृहात असताना त्याची ओळख विनोद नावाच्या क्रिकेट बेटिंग घेणाऱ्या मुख्य बुकीबरोबर झाली होती. विनोद हा छोटा राजन टोळीशी संबंधित होता. विनोद याची नवी मुंबई येथील बिल्डर सनी लाहोरिया यांच्याशी घनिष्ठ मैत्री होती. दरम्यानच्या काळात सनी याचे वडील सुनील लाहोरिया यांची हत्या झाली. त्या हत्येमध्ये बिल्डर बिजलानी याचा हात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याने सनी हा बिजलानीवर चिडून होता. त्याने यासंदर्भात विनोद याला माहिती दिली होती. तर विनोदने बिजलानी याच्या हत्येची सुपारी कोल्हापूर भागातील शूटर्सना देण्याचा डाव आखला होता. त्यासाठी विनोद व सनी यांनी यड्राव परिसरातील एका आलिशान हॉटेलमध्ये मनीष नागोरी याच्याशी पहिली बैठक केली. त्यामध्ये हत्येची सुपारी पक्की होऊन नागोरी यास दहा लाख रुपये अ‍ॅडव्हान्स दिले होते.
दरम्यानच्या काळात विनोद याचा मृत्यू झाल्याने सनीने नागोरी याच्याशी थेट संपर्क ठेवला होता. सनी हा मनीषला प्रत्येक भेटीवेळी नवीन हॅन्डसेट व सीमकार्ड वापरण्यास देत होता. त्यावरुन तो सनी याच्याशी संपर्क करीत होता. दरम्यानच्या काळात बिजलानी याच्यावर प्राणघातक हल्ला झाला; पण तो त्यातून सुदैवाने बचावला.
संशयावरून ताब्यात घेतलेल्या स्वप्निल याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तुल, दोन मॅगझिन, आठ जिवंत काडतुसे आणि रोख दहा हजार रुपये असा एक लाख २१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. त्याच्या चौकशीत बांधकाम व्यावसायिक बिजलानी याच्या खुनाची सुपारी घेतल्याचे उघड झाले होते. ही सुपारी मनीष नागोरी याने घेतली असून, त्यासाठी पिस्तुल दिले असल्याचे सांगून मनीषसह तो उचगाव येथून पनवेलकडे जाणार असल्याचे फातले याने सांगितले होते. बिजलानी याला तारखेसाठी न्यायालयात नेण्यात येणार होते. त्यावेळी त्याचा गेम करण्याचा कट रचल्याचे फातले याने त्यावेळी सांगितले होते. (वार्ताहर)
 

Web Title: Chief suspect Manish Nagori arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.