राष्ट्रव्यापी आर्थिक गणनेच्या कामात मुख्याधिकाऱ्यांनी सक्रीय व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 04:54 PM2020-10-06T16:54:35+5:302020-10-06T16:59:33+5:30
Chiefs, work of nationwide, economic census, collcator, kolhapur सातवी आर्थिक गणनेच्या कामात स्थानिक स्वराज्य संस्था विशेषत: नागरी भागातील नगरपालिका, नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांनी सक्रीय होवून सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.
कोल्हापूर : सातवी आर्थिक गणना ही देशाच्या/राज्याच्या तसेच जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेतील मोठ्या क्षेत्राच्या संरचनेबाबत माहिती मिळविण्याचे महत्वाचे स्त्रोत ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था विशेषत: नागरी भागातील नगरपालिका, नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांनी या कामात सक्रीय होवून सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात सातव्या राष्ट्रव्यापी आर्थिक गणनेंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक झाली. जिल्हा सांख्यिकी अधिकारी तथा सदस्य सचिव सायली देवस्थळी यांनी सुरुवातील सद्यस्थितीबाबत माहिती दिली.
जिल्हाधिकारी देसाई यांनी आढावा घेतला. ते म्हणाले, लॉकडाऊनमुळे प्रलंबित असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये आर्थिक गणनेचे काम पूर्ण करावे. ज्या नागरी क्षेत्रात अजूनही काम झाले नाही अशा नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांनी सक्रीय सहकार्य करावे. त्याबाबत त्यांच्याशी पत्र व्यवहार करावा. प्रगणकाकडून होणारे आर्थिक गणनेच्या कामाचे पर्यवेक्षण पर्यवेक्षकाने करावे. महिना अखेरपर्यंत उर्वरित २६७ ग्रामपंचायतींचे काम पूर्ण करावे.
बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, पोलीस उप अधीक्षक पी.एस.कदम, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणचे व्ही.जी. भागवत, जीवन शिंदे आदी उपस्थित होते.