चोरट्याचा नागरिकांवर हल्ला
By admin | Published: November 18, 2014 09:20 PM2014-11-18T21:20:50+5:302014-11-18T23:21:07+5:30
सांगलीतील थरारनाट्य : झटापटीनंतर चोरट्याला पकडले
सांगली : येथील शंभरफुटी रस्त्यावरील लक्ष्मी-नारायण कॉलनीत एका घरात घुसलेल्या चोरट्याला पकडण्याचे थरार नाट्य तब्बल तासभर रंगले. चोरट्याने पळून जाण्यासाठी नागरिकांवर लोखंडी रॉडने हल्ला केला. त्याने स्क्रू ड्रायव्हरने पोटात मारल्याने अभिमन्यू अनिल लांडे (वय २०, रा. लक्ष्मी-नारायण कॉलनी) हा तरुण जखमी झाला. आज, मंगळवारी दुपारी ही घटना घडली. झटापटीनंतर या चोरट्याला पकडण्यात अखेर यश आले. रहीम वजीर शेख (वय ६०, रा. हिप्परगी, ता. सांगोला) असे त्याचे नाव आहे.लक्ष्मी-नारायण कॉलनीतील नामदेव जेटाराम सासणे यांनी परिसरातच जागा घेतली आहे. या जागेवर गेल्या काही दिवसांपासून बांधकाम सुरु आहे. आज दुपारी चौकट बसविण्याचा मुहूर्त होता. यासाठी ते कुटुंबासह घराला कुलूप लावून तिकडे गेले होते. कॉलनीतील अन्य नागरिकही आले होते. चौकट बसविल्यानंतर सासणे कुटुंब घरी परतले. त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. कडी व कोयंडा उचकटलेला होता. सासणे थेट घरात गेले, त्यावेळी बेडरुममध्ये रहीम शेख हा कपाटातील साहित्य विस्कटत होता. सासणे यांना पाहताच शेखने घरातून पलायन केले. सासणे यांनी चोर, चोर म्हणून आरडाओरड केली. कॉलनीतील नागरिक जमा झाले. शेखला नागरिकांनी घेरले. त्यामुळे पळून जाण्यासाठी त्याने लोखंडी रॉडने नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याला पकडताना नागरिक घाबरले. तब्बल तासभर हे थरार नाट्य सुरु होते. सासणे यांच्यासह त्यांचा नातू संकेत सुनील जमदाडे, अभिमन्यू लांडे, सतीश आबा माने आदी त्याला पकडण्यासाठी पुढे गेले. त्यावेळी शेखने पुन्हा रॉडने हल्ला केला. हल्ल्याचा घाव लांडे याच्या हातावर बसला. त्यानंतर लांडेने शेखच्या हातातील रॉड हिसकावून घेऊन फेकून दिला. सर्वजण त्याला पकडण्यासाठी पुढे सरसावले. तेवढ्यात शेखने खिशातील स्क्रू ड्रायव्हर काढून लांडेच्या पोटात मारला. यामध्ये लांडेला दुखापत झाली आहे. त्यांना वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस दाखल झाले. त्यांनी शेखला ताब्यात घेतले. शेख याच्यावर सोलापूर जिल्ह्यातही काही गुन्हे दाखल झाले आहेत का? याविषयाची पोलिस माहिती घेत आहेत. शेखकडून सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातील चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्यानंतर शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. उद्या (बुधवार) दुपारी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. त्याचे साथीदार कोण आहेत का? याचा शोध घेतला जाणार आहे. अधिक तपास सुरु आहे. (प्रतिनिधी)
खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
पोलीस निरीक्षक धनंजय भांगे म्हणाले की, शेख हा सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता आहे. त्याच्याविरुद्ध सोलापूरला गुन्हे दाखल आहेत का, याची माहिती घेतली जात आहे. सासणे यांची फिर्याद घेऊन शेखविरुद्ध चोरीचा व खुनाचा प्रयत्न असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. त्याची कसून चौकशी सुरु आहे.
तब्बल तासभर हे थरार नाट्य सुरु होते. सासणे यांच्यासह त्यांचा नातू संकेत सुनील जमदाडे, अभिमन्यू लांडे, सतीश आबा माने आदी त्याला पकडण्यासाठी पुढे गेले. त्यावेळी शेखने पुन्हा रॉडने हल्ला केला. हल्ल्याचा घाव लांडे याच्या हातावर बसला.
शेखने खिशातील स्क्रू ड्रायव्हर काढून लांडेच्या पोटात मारला. यामध्ये लांडेला दुखापत झाली असून, त्याला सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयात दाखल केले.