चिखलीकरांचा शेजारधर्म; पाडळीकराचा पुनर्जन्म; पुरातून वाहून जाणाऱ्या शिवाजी पाटील यांना धाडसाने वाचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:09 AM2018-07-23T00:09:22+5:302018-07-23T00:09:27+5:30
कोल्हापूर : पाडळी बुद्रुक (ता. करवीर) येथील शिवाजी महादेव पाटील यांच्या घरी बुधवारी (दि. १८) सायंकाळी मित्र, नातेवाईक, शेजारी-पाजारी यांची नुसती रीघ लागली होती. जो तो भेटून त्यांना पुनर्जन्माच्या शुभेच्छा देत होता, कोणी दरडावून ‘असले फालतू धाडस पुन्हा करू नको’, असा सल्ला देत होता. त्याला कारणही तसेच होते. कुणाचा विश्वास असो नसो; पण बुधवारच्या घटनेत पाटील यांचा पुनर्जन्म झाला. त्यात शेजारधर्म निभावणाºया प्रयाग चिखली गावच्या तरुणांचा सिंहाचा वाटा आहे. घटना जरी बुधवारची असली तरी रविवारी सोशल मीडियावरुन ती चर्चेचा विषय ठरली.
या घटनेबाबतच्या भावना ‘चिखलीकरांचा शेजारधर्म आणि नशिबाची बळकट दोरी’ या लेखाच्या माध्यमातून ज्येष्ठ पत्रकार शिवाजी पाटील यांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या. चिखली ते वरणगे-पाडळी अंतर दोन-अडीच किलोमीटरचे; पण पावसाळ्यात रस्त्यावर पाणी आल्यामुळे चिखलीतून पाडळीला येण्यासाठी किमान २२ ते २४ किलोमीटरचा पल्ला मारावा लागतो. हे टाळण्यासाठी मग काहीजण अतिरेकी धाडस करतात; मात्र काहीवेळा ते जिवावरही बेतू शकते. बुधवारच्या घटनेत काहीसे तसेच घडले. चिखलीच्या दूध संस्थेत सचिव असलेल्या शिवाजी पाटील यांनी पुराच्या पाण्यातून पाडळीकडे आपल्या घरी येण्याचा प्रयत्न केला; पण काही अंतर गेल्यानंतर पाण्याच्या वेगामुळे त्यांचे पाय उचलले आणि ते वाहून जाऊ लागले. त्यांचे पाय उचलल्यानंतर क्षणार्धात त्यांना एका छोट्या झाडाचा आधार मिळाला. त्यांनी आपली पँट डोक्याला गुंडाळून ठेवली होती, गडबडीत ती निसटली आणि वाहून गेली. त्याबरोबरच खिशातील मोठी रक्कमही गेली. शर्टच्या खिशात मोबाईल होता म्हणून बरे, त्यांनी कसाबसा मोबाईल काढला आणि चिखलीतील संभाजी पाटील यांच्यासह काहींना मदतीसाठी फोन करण्याचा प्रयत्न केला; पण मोबाईलमधील बॅलन्स् संपला होता. त्यांनी कंपनीला फोन करून तात्पुरता दहा रुपयांचा बॅलन्स् घेतला. नशिबाची दोरी किती बळकट पहा, संपर्क झाला नि बॅलन्स् संपला आणि पुढच्याच क्षणी मोबाईल पाण्यात पडला.
इकडे चिखलीतील तरुणाई कामाला लागली. जमेल तेवढे करून सचिव शिवाजी पाटील यांना वाचविण्याचा निर्धार केला. मोठमोठे रोप जमवले आणि ‘शेजारी’ बचाव मोहीम सुरू झाली. दोरीला धरून एकमेकांच्या हातात हात घालून तरुण पाण्यात उतरले. प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून ही मुले पाटील यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांना धीर दिला आणि खांद्यावर उचलून घेऊन त्यांना सुरक्षित पाण्यातून बाहेर काढले.
काळ आला होता पण...
पाण्याच्या ताकदीला आव्हान देणे जिवावर बेतू शकते, हे दिसले आणि नशीब बलवत्तर असेल तर साक्षात मृत्यूलाही माघारी जावे लागते, हेही दिसले. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, या म्हणीचा अर्थही ते दोन तास शिकवून गेले, अशी प्रतिक्रिया शिवाजी पाटील यांनी व्यक्त केली.