चिकोत्रा धरणाला हवी पुनर्भरणाची मात्रा
By Admin | Published: May 5, 2017 11:53 PM2017-05-05T23:53:06+5:302017-05-05T23:53:06+5:30
दीड टीएमसी पाणीसाठा वाढविणे शक्य : वाया जाणाऱ्या पाण्याचा सदुपयोग होऊन धरण पूर्ण भरण्याची शक्यता
दत्तात्रय पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हाकवे : कागल, आजरा व भुदरगड मधील काही गावांना वरदाई ठरलेल्या चिकोत्रा धरणातील पाणीसाठा बेभरवशाचा असल्यामुळे ऐन उन्हाळ्यात येथील ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या धरणाचे पाणलोट क्षेत्र आणि येथील पावसाचे अत्यल्प प्रमाण लक्षात घेता हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अन्य पर्यायाचीच गरज आहे. यामध्ये म्हातारीच्या पठारावरील पाणी या धरणाकडे वळविण्याबरोबरच पुनर्भरण प्रकल्प राबविणे आवश्यक आहे. धरणाच्या खालील भागातून ऐन पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी आणि चिकोत्रा नदीला पश्चिमेकडून नागणवाडी प्रकल्पापासून आलेला ओढा मिळतो. त्या हसूर खुर्द बंधाऱ्यावर हा पुनर्भरणाचा प्रकल्प राबवून चिकोत्रा धरण दरवर्षी पूर्ण क्षमतेने भरणे शक्य आहे.
१९९६ मध्ये चिकोत्रा खोऱ्यातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची गरज ओळखून पाटबंधारे विभागाने १.५ टी.एम.सी. इतका पाणीसाठी होईल या दृष्टीने चिकोत्रा नदीवर (झुलपेवाडी जवळ) हे धरण बांधले. परंतु, हे धरण आजपर्यंत केवळ तीन वेळाच पूर्ण क्षमतेने भरले. त्या-त्या वर्षी या भागात पाण्याचा सुकाळ झाला. या लाभ क्षेत्रातील १३ हजार एकर पिकावू जमिनीपैकी तब्बल १० हजार क्षेत्रावर उसासारखी बारमाई पिके घेण्यात आली. परंतु, गेल्या चार वर्षांपासून या धरणात अल्प पाणीसाठा झाला. गतवर्षी तर अगदी नीचांकी ४६ टक्के पाणीसाठा झाल्याने या भागातील पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागली.
चिकोत्रा नदीवर खडकेवाडा- बेळुंकीपर्यंत २९ कोल्हापुरी बंधारे बांधून त्यामध्ये पाणी साठविले जाते. परंतु, ही नदी उथळ असल्यामुळे पाणी सोडणे बंद करताच २० ते २२ तासांत हे बंधारे रिकामे पडतात. त्यामुळे धरणातून वारंवार पाणी सोडावे लागते. परिणामी हे धरण पूर्ण क्षमतेने भरणे हाच एकमेव पर्याय आहे.
गत पावसाळ्यामध्ये म्हातारीच्या पठारावरील वाया जाणारे पाणी या धरणात वळविण्यात पाटबंधारे विभागाला यश मिळाले. मात्र, यामुळे पाणीसाठ्यात १० ते १२ टक्के इतकीच अल्पशी वाढ झाली. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही कमी-अधिक प्रमाणात पाण्याची टंचाई भासत आहे. पाटबंधारे विभाग व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयामुळे आॅक्टोबर-एप्रिल अखेर पाण्याचे नियोजन करून लोकांना पिण्यासह थोड्याफार शेतासीठीही पाणी उपलब्ध करून दिले. यासाठी प्रसंगी जीव धोक्यात घालून या दोन्ही विभागाचे अधिकारी रात्री-अपरात्री गस्त घालून नदीतील पाण्याची राखण करताना दिसत होते, तर उपसाबंदी काळात अवैधपणे पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई केली.
दरम्यान, केवळ दीड टी.एम.सी. क्षमता असणारे प्रत्येक वर्षी भरले तर कागलसह आजरा व भुदरगडमधील काही गावांतील १३ ते १५ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निकालात निघणार आहे. यासाठी शासनाच्या पुढाकारासह तिन्ही तालुक्यांतील लोकप्रतिनिधींची प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे.
शेतीसाठी शेवटचेच पाणी...
चिकोत्रा धरणात सध्या, २१ टक्केच म्हणजेच २५० दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा शिल्लक आहे, तर धरणातून ५ ते १४ मे दरम्यान पाणी सोडण्यात येणार आहे. हे पाणी शेवटच्या बेळुंकी बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी १०० दशलक्ष घनफूट इतके पाणी लागणार आहे.
त्यामुळे भविष्यात पाऊस पडेपर्यंत उर्वरित पाणी शिल्लक ठेवले जाणार असून, जूनच्या पहिल्या आठवड्यात बंधाऱ्याचे सर्व बरगे काढून शेतीसाठी उपसाबंदी करून केवळ पिण्यासाठीच पाणी सोडले जाणार आहे. त्यामळे या काळात वळीव पावसाच्या हजेरीवरच ऊस पिकांचे भवितव्य अवलंबून आहे.
असे करता येईल पुनर्भरण
१ हसूर बंधाऱ्याजवळ चिकोत्रा नदीला पश्चिम भागातून मोठा ओढा मिळाला आहे. जुलै व आॅगस्ट महिन्यांत येथे मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होते.
२ मात्र, हे पाणी वाहूनच जाते. त्यामुळे ७ ते८ कि.मी. अंतर हसूर येथून पाणी योजना करून हे पाणी चिकोत्रा धरणात टाकले तर हे धरण प्रतिवर्षी पूर्ण क्षमतेने भरू शकते, असा तज्ज्ञांचा दावा आहे.
३ मात्र, ही बाब खर्चिक असून, याचे शासन- स्तरावरच धोरण राबविणे गरजेचे आहे.
तर हजारो कुटुंबांचे नंदनवन...
पुनर्भरणाचा प्रकल्प राबवून चिकोत्रातील पाणीसाठा वाढविला तर ३४ ते ४० गावांतील जनजीवन उंचावणार आहे. या भागात शेताची उत्पादकता वाढणार असून, दुग्ध व्यवसायालाही बरकत येणार आहे. त्यामुळे एक-दोन रस्ते करण्याचे मागे-पुढे झाले तरी चालेल; परंतु, हजारो कुटुंबांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणणाऱ्या अशा प्रकल्पाला अग्रकम देणे गरजेचे असल्याचेही अनेक जाणकारांनी याबाबत ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.