‘चिकोत्रा’ची उपसाबंदी चार दिवसांसाठी शिथिल

By admin | Published: April 27, 2016 09:38 PM2016-04-27T21:38:11+5:302016-04-28T00:21:23+5:30

शेतीसाठी परवाना : १६ टक्के पाणी; जूनअखेर तहान भागणार

'Chikotra' lecture will be relaxed for four days | ‘चिकोत्रा’ची उपसाबंदी चार दिवसांसाठी शिथिल

‘चिकोत्रा’ची उपसाबंदी चार दिवसांसाठी शिथिल

Next

दत्तात्रय पाटील -- म्हाकवे--चिकोत्रा धरणातील अल्प पाणीसाठा लक्षात घेता पाटबंधारे विभागाने १0 जानेवारीपासून चिकोत्रा नदीतून शेतीसाठी पूर्णत: उपसाबंदी लागू केली होती. या धरणामध्ये सध्या २५ द.श.ल.घ.फूट इतकाच म्हणजेच केवळ १६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या या नदीवरील सर्वच १८ बंधाऱ्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाणी असून, त्याचा वापर चिकोत्रा खोऱ्यातील नागरिकांना पिण्यासाठीच केला जात आहे. असे असले तरी या बंधाऱ्यासह नदीपात्रातील खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी खराब होऊन ते पिण्यासाठी अयोग्य होते. त्यामुळे धरणातून पुढील पाणी सोडण्यापूर्वी २ ते ५ मे या कालावधीत उपसाबंधी शिथिल करून हे पाणी पिकांसाठी उपसा करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा उपसाबंदी लागू केली जाणार आहे. सध्या धरणात जूनअखेर चिकोत्रा खोऱ्यातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
धरणाचा जलस्रोतच अत्यंत कमकुवत आहे. धरणात अधिकाधिक पाणीसाठा होण्याच्या दृष्टीने धरणाच्या दक्षिणेकडील ओढे, नाले या धरणात वळविण्यासाठी राजकीय तसेच प्रशासकीय पातळीवर फारसा प्रयत्न होत नाही. त्यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यात अडचणी येत आहेत. तसेच यंदा पाऊसही अपुरा झाल्यामुळे हे धरण केवळ ४६ टक्केच भरले. त्यामुळे प्रशासनाने १0 जानेवारीपासून चिकोत्रा नदीतून शेतीसाठी पाणी उपसा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चिकोत्रा खोऱ्यात दुष्काळाच्या झळा गडद होऊन येथील शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला.


सहकार्य करण्याचे पाटबंधारे विभागाचे आवाहन
दरम्यान, या महिन्यात ५ ते ८ एप्रिल या कालावधीत ही उपसाबंदी शिथिल करून शेतकऱ्यांना पाणी उपसा करण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र, काही बडे शेतकरी आणि राजकीय वरदहस्त असणारे उपसाबंदी झुगारून अवैध पाणी उपसा करीत असतात, असेही निदर्शनास येत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये यासाठी सर्वांनी उपसाबंदी उठविलेल्या कालावधीत उपसा करून सहकार्य करण्याचे आवाहनही पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे.
 

Web Title: 'Chikotra' lecture will be relaxed for four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.