‘चिकोत्रा’त पाणी सोडणार
By Admin | Published: October 4, 2015 12:47 AM2015-10-04T00:47:34+5:302015-10-04T00:47:34+5:30
धोक्यात आलेल्या पिकांसाठी पाण्याची दोन आवर्तने
कोल्हापूर : चिकोत्रा धरणात ४८ टक्के पाणीसाठा आहे. त्यातील बाष्पीभवन तसेच अन्य कारणांनी वाया जाणारे पाणी वगळता २५० ते ३०० दक्षलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या खोऱ्यातील धोक्यात आलेल्या पिकांसाठी पाण्याची दोन आवर्तने करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी (दि. २) जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समितीच्या बैठकीत दिले.
गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या सभागृहात चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार हसन मुश्रीफ उपस्थित होते.
चिकोत्रा खोऱ्याला दोन आवर्तने दिल्यानंतर जे पाणी शिल्लक राहील, ते पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेशही यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.
पाण्याअभावी चिकोत्रा खोऱ्यातील ऊसपीक धोक्यात आले आहे. पिकांना वाचविण्यासाठी पाणी सोडण्याची गरज असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.
तीन दिवसांपासून चिकोत्रा परिसरातही दमदार पाऊस सुुरू आहे. यामुळे पिकांना काहीसे जीवदान मिळाले आहे. त्यामुळे महिन्याभरानंतर पाण्याचे आवर्तन करण्याचाही निर्णय झाला. या परिसरातील उसाची तोड प्राधान्यक्रमाने केली जाईल, त्याबाबत साखर कारखान्यांना सूचना द्याव्यात. तसेच यापुढे ऊसाची लागवड करू नये, असा निर्णयही घेण्यात आला. दौलत कारखान्याच्या कर्जास हप्ते घालून देण्याची मागणीही मुश्रीफ यांनी केली. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता एस. डी. साळुंखे, कार्यकारी अभियंता विजय पाटील, एस. एम. चव्हाण उपस्थित होते. (प्रतिनिधी)