टाउन हॉल बागेतून बालकाचे अपहरण
By admin | Published: February 19, 2015 12:29 AM2015-02-19T00:29:39+5:302015-02-19T00:30:51+5:30
कोल्हापुरातील घटना : शोध घेऊनही सापडला नाही, पोलीस हतबल
कोल्हापूर : टाउन हॉल बागेत खेळत असलेल्या दोन वर्षांच्या बालकाचे अज्ञातांनी सोमवारी (दि. १६) दुपारी अपहरण केल्याचा प्रकार घडला. फरान ऊर्फ आयान अकिब जांभारकर (रा. सिद्धार्थनगर) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी व नातेवाइकांनी त्याचा शोध घेऊनही तो अद्याप सापडलेला नाही. त्याचे अपहरण नेमके कोणी केले असावे, याबाबत पोलीस अत्यंत बारकाईने माहिती घेत आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले, अकिब मन्सूर जांभारकर हे केळी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांची टाउन हॉल बागेजवळ केळीची हातगाडी आहे. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास त्यांचा मुलगा फरान हा टाउन हॉल बागेत इतर मुलांसोबत खेळत होता.
दुपारी तीननंतर तो अचानक गायब असल्याचे दिसले. त्याच्यासोबत खेळणाऱ्या मुलांनी त्याचा बागेत शोध घेतला असता तो आढळला नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्या वडिलांना हा प्रकार सांगितला. वडिलांनी तो घरी गेला आहे का, त्याची चौकशी केली. तिथेही तो नसल्याचे लक्षात आले. आजूबाजूला चौकशी केली असता तो आढळला नाही. त्यानंतर त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १७) फिर्याद दिली. पोलिसांनी वायरलेसवरून जिल्ह्णातील सर्व पोलिसांना सूचना केल्या. फरान याची उंची दोन फूट, अंगाने जाड, रंगाने काळा-सावळा, गळ्यात काळ्या रंगाचा तावीज, अंगात पिवळ्या रंगाचा टी-शर्ट, थ्री फोर्थ पॅँट, उजव्या डोळ्याच्या भुवईवर आॅपरेशनचे जुने टाक्याचे व्रण असून तो तोतरा बोलतो. पोलिसांनी टाउन हॉल परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेजही पाहिले असून, त्यामध्येही तो दिसून आलेला नाही. (प्रतिनिधी)