बालकलाकारांच्या अभिनयाला धुमारे
By admin | Published: January 2, 2015 11:44 PM2015-01-02T23:44:49+5:302015-01-03T00:15:39+5:30
राज्य बालनाट्य स्पर्धा : गोविंद गोडबोले यांच्या हस्ते उद्घाटन
कोल्हापूर : जीवनाचा अर्थ कळण्यासाठी चांगल्या संस्कारांचे संचित किती गरजेचे आहे हे मांडणारा दोन फुले, स्त्रीशिक्षणाचा जागर करणारी सावित्रीची लेक, पुरोगामी विचारसरणीच्या मुलाने भ्रष्टाचाराला केलेला विरोध, शिक्षणासोबतच मूल्यांचे महत्त्व मांडणाऱ्या त्या चौघी... अशा विविधांगी विषयांवर भाष्य करीत बालकलाकारांनी राज्य नाट्यस्पर्धेचा पहिला दिवस गाजविला. यानिमित्ताने लहान मुलांच्या सामाजिक जाणिवा पालकांच्या जाणिवांपेक्षाही किती समृद्ध असतात, याचे प्रत्यंतर आले.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने १२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला आज, शुक्रवारपासून प्रारंभ झाला. शाहू स्मारक भवनमध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधिकारी भरत लांघी, रमेश हंकारे व ज्येष्ठ बालसाहित्यिक गोविंद गोडबोले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. परीक्षक मीनाक्षी वाघ, नविनी कुलकर्णी, वामन तावडे उपस्थित होते.
सकाळी दहा वाजल्यापासून सादरीकरणसुरु झाले. दिवसभरात नॉट फॉर सेल (ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल (सांगली), दोन फुले (आदर्श गुरुकुल विद्यालय, पेठवडगाव), बीज अंकुरले (आजरा हायस्कूल), त्या चौघी (अण्णा भाऊ इंग्लिश स्कूल), सावित्रीची लेक (दामले विद्यालय), स्वातंत्र्य - एक प्रश्नचिन्ह (फाटक हायस्कूल, रत्नागिरी), ही नाटके सादर झाली. आज काळोखाच्या प्रकाशरेषा, कोल्हापुरी मिस ८, आम्ही नाटक करीत आहोत, आम्ही तुमचे सोबती, सांजसावल्या, आम्ही सात, क्रांतिसिंह ही नाटके सादर होणार आहेत. (प्रतिनिधी)
पाच दिवसांत नाटक
ठबाचणीतील एम. आर. पाटील विद्यालयाने ‘श्यामची आई’ या नाटकाचे सादरीकरण काही अडचणींमुळे रद्द केले. पण, विद्यार्थ्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून शाळेने पाचच दिवसांपूर्वी ‘रोगांचा दरबार’ नाटक बसविले. अवघ्या अर्ध्या तासाचे हे नाटक विद्यार्थ्यांनी दमदारपणे सादर केले. मुख्याध्यापिका अरुणा पाटील यांच्यासह शिक्षकांनी यासाठी पुढाकार घेतला.