पैशांसाठी मुलाचा आई-वडिलांवर हल्ला
By उद्धव गोडसे | Published: July 7, 2024 01:22 PM2024-07-07T13:22:06+5:302024-07-07T13:22:28+5:30
उत्तरेश्वर पेठेतील घटना, हतबल नातेवाईकांची पोलिसात धाव
उद्धव गोडसे, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : 'तुम्ही उद्या दुपारपर्यंत माझ्या बँक खात्यावर दोन लाख रुपये पाठवा. नाहीतर दोघांना ठार मारतो,' असे धमकावत पोटच्या मुलाने आई-वडिलांवर तलवारीने हल्ला केला. सुदैवाने घराचा दरवाजा बंद केल्याने आई-वडील बचावले. हा प्रकार उत्तरेश्वर पेठेत शुक्रवारी (दि. ५) मध्यरात्रीच्या सुमारास घडला. याबाबत वडील जीवन विलासराव नलवडे (वय ५६, रा. उत्तरेश्वर पेठ) यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मुलगा साई (वय २४) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले.
लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेश्वर पेठेतील साई नलवडे हा सातारा येथील सैनिक शाळेत शिकला. त्यानंतर एका नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र, चुकीच्या संगतीमुळे त्याला व्यसन जडले. यातून महाविद्यालयीन शिक्षण अर्ध्यात सुटले. गेल्या काही वर्षांपासून तो आई, वडिलांना दमदाटी करून पैसे उकळत होता. शुक्रवारी रात्री त्याने तलवारीचा धाक दाखवत वडिलांकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. उद्या दुपारपर्यंत पैसे माझ्या बँक खात्यात जमा झाले नाहीत, तर तुम्हाला दोघांनाही ठार मारणार, अशी धमकी त्याने दिली. यावेळी तलवार घेऊन अंगावर येणा-या मुलाला वडिलांनी घराबाहेर ढकलून दरवाजा लावून घेतला. मुलाने घराच्या दरवाजावर, जिन्याच्या ग्रिलवर आणि भिंतीवर तलवार मारत दहशत माजवली. या प्रकाराने घाबरलेल्या आई, वडिलांसह इतर नातेवाईकांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन मुलाच्या विरोधात फिर्याद दिली.
समुपदेशनाचा सल्ला
चुकीची संगत आणि व्यसनांमुळे आई, वडिलांवर हात उगारणा-या मुलाला शिक्षेपेक्षा समुपदेशनाची गरज आहे. त्याच्या समुपदेशनासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी नलवडे कुटुंबीयांना दिला.