बाल विकास व महिला सबलीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:14 AM2019-06-05T00:14:56+5:302019-06-05T00:15:03+5:30
भारत पाटील एकात्मिक बाल विकास योजना ही आपल्या ग्रामीण भागातील मुले व महिला यांच्या जीवनामध्ये ‘संजीवनी’ ठरू शकते , ...
भारत पाटील
एकात्मिक बाल विकास योजना ही आपल्या ग्रामीण भागातील मुले व महिला यांच्या जीवनामध्ये ‘संजीवनी’ ठरू शकते , हे व्यक्तिश: माझ्या ध्यानी आले होते. सततच्या बैठका व चर्चांमधून याविषयीची खोली बऱ्यापैकी मला समजली होती. त्यावेळी पन्हाळा तालुक्यात अंगणवाडी, मुलं व महिला याविषयी उपलब्ध साधन सामग्री मात्र खूपच अत्यल्प होती व खूप साºया अडचणीच होत्या. कारण तसं या विषयाकडे कोणीही जाणीवपूर्वक लक्ष दिले नव्हते. पंचायत समितीने मात्र आपला बाल विकास प्रकल्प आदर्श कसा करता येईल? यासाठी कंबर कसली होती. सांगली, कोल्हापूर व वारणा विद्यामंदिर येथील बालवाडीच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती घेतली होती. याबाबत वारणेचे पानगावकर सर यांनीही खूप सहकार्य केले होते. सेविका व मदतनीस यांचे शेड्युल कसे असावे? बाल शिक्षण व पूरकपोषण आहार व आरोग्य याविषयी त्यांची क्षमता बांधणी कशी करता येईल? लहान मुलांची मानसिकता व स्वभाव याबाबतही काही महत्त्वाच्या टिप्स कशा देता येतील? याचा सांगोपांग विचार आम्ही करत होतो. यासाठी ‘अनौपचारिक शिक्षण व त्याचं महत्त्व’ याबाबत सविस्तर पुस्तिका करण्याचे काम गतीने सुरू होते. जी. डी. सर (पन्हाळा) व प्रकल्प अधिकरी यासाठी परिश्रम घेत होते. एक महिन्याच्या आत ही पुस्तिका त्यांनी तयार केली होती. एक दिवसीय सेविका व मदतनीस यांचे प्रशिक्षण घेऊन त्यामध्ये ‘पुस्तिका प्रकाशन’ करायचे होते.
पन्हाळा तालुक्यात पर्जन्यमान जास्तच असते. या दिवसांत अंगणवाड्यांची खूपच दयनीय अवस्था असायची. आपण अंगणवाड्यांना काय काय भौतिक सुविधा देऊ शकतो? यावर आम्ही विचार करत होतो. दर हजारी लोकसंख्येमागे एक अंगणवाडी असे शासन धोरण होते; पण तालुक्याची लोकसंख्या विचारात घेता फक्त २०३ अंगणवाड्या मंजूर होत्या. अजूनही बºयाच अंगणवाड्या मंजूर करून घेणे ही तालुक्याची गरज होती. लोकसंख्यानिहाय अंगणवाडी मंजुरीचा प्रस्ताव सादर करण्याबाबत ठरले व तसा पाठपुरावाही सुरू झाला. कार्यरत अंगणवाड्यांना कोणत्या भौतिक सुविधा देता येतील याबाबत प्राथमिक यादी केली होती. टेबल, खुर्च्या व कपाट, मुलांना बस्कर पट्ट्या, शुद्ध पाण्यासाठी हंडा, पूरक आहार शिजविण्यासाठी सोलर प्याराबॉलिक कुकर, रंगकाम व बोलक्या भिंती याबाबी एक वर्षात सगळ्या अंगणवाड्यांना पुरविण्याचा आम्ही निर्धार केला होता.
पुस्तिका प्रकाशन व एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे सीईओ प्रभाकर देशमुख यांना बोलाविले होते. त्यांना ही पुस्तिका व पन्हाळ्याचा हा अभिनव उपक्रम खूपच आवडला होता. अनौपचारिक शिक्षण पुस्तिका याचे काम अत्यंत दर्जेदार झाले होते. यामुळे सेविकांना त्यांचे कार्य अत्यंत सुलभ झाले. पन्हाळा तालुक्यातील आदर्श अंगणवाडी उपक्रम कसा प्रभावीपणे राबवायचा याविषयी सविस्तर दिशा दिली होती.
आपली अंगणवाडी आदर्श व्हावी यासाठी ग्रामपंचायत, सरपंच, सदस्य, सर्व संस्था व दानशूर व्यक्तींना मदतीसाठी प्रत्यक्ष भेटून विनंती करायची यासाठी ‘संपर्क सप्ताह’ आयोजित केला होता. यासाठी पालक बैठकाही आयोजित केल्या होत्या. या सप्ताहात आम्हीही सर्व सदस्य गावोगावी जाऊन भेटीद्वारे मदतीतून आपली अंगणवाडी आदर्श करण्याबाबत विनंती करत होतो. हा संपर्क सप्ताह यशस्वी करण्यासाठी सेविका व मदतनीस आणि सुपरवायजर यांनी खूप परिश्रम घेतले होते. जर एखाद्या मिशनबाबत सर्वांनी संकल्प केला व तो निर्धारपूर्वक राबवला, तर कितीही काम अवघड असले तरी ते सहज साध्य कसे होते? हा अनुभव मला त्यावेळी आला.
आम्ही त्यावेळी एका वर्षात ६० अंगणवाड्या बांधकामासाठी निधी प्राप्त केला होता. ग्रामपंचायतींनी एक टेबल व दोन खुर्च्या देऊन आपलाही खारीचा वाटा उचलला. पंचायत समितीच्या सेस फंडामधून बालकांना शुद्ध पाणी पिण्यासाठी सर्व अंगणवाड्यांना ‘वॉटर फिल्टर’ पुरवले होते. विनय कोरे हे त्यावेळी अपारंपरिक ऊर्जामंत्री होते. त्यांच्या सहकार्यातून मुलांना पोषण आहार उत्तम व पौष्टिकपणे शिजवण्यासाठी ‘सोलर पॉरोबोलिक कुकर’ शासन व पंचायत समितीच्या योगदानातून सर्व अंगणवाड्यांना पुरवले होते. सोलर कुकरमध्ये आरोग्यदायी आहार शिजवणारा आपला पन्हाळा तालुका हा त्यावेळी ‘देशातील पहिला तालुका’ ठरला होता. एका वर्षात तसं आम्ही जवळजवळ ८० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले होते. दर दोन महिन्याला बीट वाईज आढावा बैठका घेत होतो. यासाठी प्रकल्प अधिकरी विजयसिंह जाधव व शिर्के कार्यरत होते. जसजसे हे अभियान गावोगावी पोहोचले, तसे महिला व बाल विकासबाबत अनेक नवनवीन कल्पना समोर येत होत्या. आम्ही केलेल्या पाठपुराव्याला नंतर यशही आले. आज तालुक्यात ३०५ अंगणवाड्या व २७ मिनी अंगणवाड्या मंजूर असून कार्यरत आहेत. जवळजवळ दोनशे इमारती आहेत. शहरातील बालवाडी व अंगणवाडीपेक्षा उत्तम, गुणवत्ता असलेले काम आपण आपल्या खेड्यात उभं करू शकलो तर.. खरंच परिपूर्ण ग्रामविकास होईल.
(लेखक ग्रामविकास व व्यसनमुक्ती चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते आहेत.)