पाण्याच्या बादलीत पडून बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:27 AM2021-05-20T04:27:44+5:302021-05-20T04:27:44+5:30
कोल्हापूर : घरात खेळत असताना तोल जाऊन पाण्याच्या बादलीत पडल्याने ११ महिन्याच्या बालकाचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला. अरजित विक्रम ...
कोल्हापूर : घरात खेळत असताना तोल जाऊन पाण्याच्या बादलीत पडल्याने ११ महिन्याच्या बालकाचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला. अरजित विक्रम शर्मा (वय ११ महिने, सध्या रा. सुभाषनगर बाळू मामा गल्ली, मूळ रा. गोरखपूर) असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.
उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील विक्रम शर्मा हे सुतारकाम करतात. कामानिमित्त ते गेल्या काही वर्षांपासून पत्नी गीतासह कोल्हापुरात राहतात. त्यांना अरजित हा ११ महिन्याचा, तर वर्तिका व गौरी या दोन मुली आहेत. यापैकी गौरी ही आजीकडे राहते. बुधवारी विक्रम हे कदमवाडीतील एका घराचे सुतारकाम करण्यासाठी कामावर गेले होते. दुपारी त्यांची पत्नी गीता व ११ महिन्याचा अरजित हे घरी होते. पत्नी गीता या कामामध्ये व्यस्त असताना अरजित हा खेळत खेळत दाराजवळ ठेवलेल्या सुमारे १५ लिटरच्या बादलीकडे गेला. त्यात तो वाकून पाहात होता. यादरम्यान त्याचा तोल जाऊन तो त्या बादलीत पडला. यावेळी त्याचा श्वास गुदमरला. हातातील काम संपवून गीता या मुलाला शोधू लागल्या. तेव्हा अरजित पाण्याच्या बादलीत पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी जोरात ओरडून घरमालकांना बोलाविले. तात्काळ त्यांनीही लहानग्या अरजितला खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा पाण्यात पडून मृत्यू झाला. आपला बाळ काही हालचाल करीत नसल्याचे पाहून गीता यांनी फोडलेला हंबरडा मन हेलावणारा होता. याची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
फोटो : १९०५२०२१-कोल-अरजित
--