वडिलांच्या रिक्षाखाली सापडून चिमुकला ठार, गावात हळहळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 10:11 PM2019-10-04T22:11:58+5:302019-10-04T22:12:50+5:30
नातेवाइकांचा आक्रोश : गावात हळहळ
कोल्हापूर : नागाव (ता. हातकणंगले) येथे वडील घरासमोर टेम्पो रिक्षा पाठीमागे घेत असताना मागील चाकाखाली सापडून सव्वा वर्षाचे बालक जागीच ठार झाले. चेतन कमलेश डांगी असे मृत बालकाचे नाव आहे. पोटच्या एकुलत्या मुलाचा स्वत:च्या रिक्षाखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने आई-वडिलांसह नातेवाइकांनी केलेला आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता. घटनास्थळावरील दृश्य मन हेलावून टाकणारे होते. शुक्रवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चिमुकल्या चेतनच्या मृत्युने गावात हळहळ व्यक्तकेली जात आहे.
पोलिसांनी सांगितले, कमलेश डांगी हे मूळचे राजस्थान, चित्तोडगडचे रहिवाशी आहेत. पाच वर्षांपासून आंबेडकरनगर, नागाव येथे भाड्याने कुटुंबासह राहतात. त्यांचा शिरोली एमआयडीसी येथे भेलचा गाडा आहे. शुक्रवारी दुपारी कमलेश, त्यांची पत्नी, आजी व इतर नातेवाईक चेतनला घेऊन घरामध्ये जेवत बसले होते. जेवन झाल्यानंतर भेलचा गाडा सुरू करण्यासाठी कमलेश यांनी भेलचे साहित्य टेम्पो रिक्षात भरले. रिक्षा मागे घेत असताना घरातून त्यांचा मुलगा चेतन पळत बाहेर आला तो धडकून खाली कोसळला. रिक्षाच्या आवाजाने कमलेश यांच्या हा प्रकार लक्षात आला नाही. त्यांनी रिक्षा तशीच मागे घेतली असता, पाठीमागील चाक चेतनच्या अंगावरून गेले. त्याची किंचाळी ऐकू येताच रिक्षा थांबवून कमलेश मागे धावत आले. त्यांच्या पाठोपाठ घरातील सर्वजण बाहेर आले. रक्ताच्या थारोळ्यात चेतन निपचित पडला होता. त्याला तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. स्वत:च्या रिक्षाखाली मुलगा सापडून मृत झाल्याचा धक्का वडील कमलेश यांना बसला. ते या घटनेने भांबावून गेले. शेजारील लोकांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासह आई व नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. चिमुकल्या चेतनचा मृतदेह पाहून अनेकांना गहिवरून आले. याप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.