बच्चा बच्चा जानता है, सच क्या है?
By admin | Published: January 21, 2016 11:57 PM2016-01-21T23:57:38+5:302016-01-22T00:52:28+5:30
हसन मुश्रीफ : विधान परिषद निवडणुकीत संजय घाटगे यांचे चारपैकी तीन मतदार 'अजिंक्यतारा'वर
कोल्हापूर : कागलच्या मेळाव्यात विधान परिषदेच्या निवडणुकीमधील आर्थिक लाभाबाबत मी कोणाचेही नाव घेऊन टीका केली नव्हती. तरीही संजय घाटगे यांनी खुलाशाच्या वृत्तामध्ये काही मते मांडली आहेत. मी नाव न घेता टीका केली होती; परंतु ‘बच्चा बच्चा जानता है, सच क्या है,’ असा उपरोधिक सवाल आमदार हसन मुश्रीफ यांनी उपस्थित करून संजय घाटगे यांच्यावर प्रसिद्धीपत्रकातून गुरुवारी ‘निशाणा’ साधला.
गेल्या आठवड्यात कागलमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा मेळावा झाला. यावेळी विधान परिषद निवडणुकीतील अर्थकारणावर मुश्रीफ यांनी भाष्य केले होते. त्याचा खुलासा करताना घाटगे यांनी मुश्रीफ यांच्यावर टीका केली. तिला प्रत्युत्तर देण्यासाठी मुश्रीफ यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे, गटनेते हे दलाली घेऊ लागलेत. विधान परिषद निवडणुकीत माझ्या मतदारसंघातील दोन नेते मालामाल झाले. एका नेत्याने दहा मतदारांच्या बदल्यात एक कोटी रुपये (मतदारांचे वगळून) व एका नेत्याने १६ टायरचे तीन टँकर (मुंबईसाठी), सत्तारूढ संचालकांप्रमाणे पैशांचे पाकीट, ३० लाख रुपये (मतदारांचे वगळून) घेतले. त्या बदल्यात भोळ्या-भाबड्या कार्यकर्त्यांच्या गटाचा व मतदारांचा लिलाव झाला. राजकारण एका विचित्र वळणावर चालले आहे. अशांबरोबर आपल्याला सामना करायचा आहे, असे मी त्या मेळाव्यात सांगितले. हे सांगताना मी कोणाचेही नाव घेतले नव्हते. कोणाच्या डोक्यावर ही टोपी बसली असेल तर त्यास माझा नाइलाज आहे. मात्र, तालुक्यातील लहान मुलालाही ही वस्तुस्थिती माहिती असणार, याची खात्री आहे.
संजय घाटगे यांना मी विचारू इच्छितो की, तुम्ही व प्रा. संजय मंडलिक एकत्र विचार करून निर्णय घेणार, असे जाहीर केले होते. मंडलिकांना लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने माजी आमदार महादेवराव महाडिकांना पाठिंबा देणे सोयीचे नव्हते. लोकसभा निवडणुकीत मंडलिक यांचा सामना खासदार धनंजय महाडिक यांच्याबरोबर झाला होता. त्यामुळे मंडलिकांचा निर्णय योग्य होता, हे कोणीही मान्य करील; पण प्रा. मंडलिक यांच्या निर्णयाबरोबर तुम्ही का राहिला नाही? पुढील राजकारण व निवडणुकीसाठी माजी आमदार महाडिक यांचे सहकार्य राहणार आहे, असे विधान आपण केले, याचा अर्थ मंडलिक गटाच्या सहकार्यापेक्षा महाडिक यांच्या सहकार्यास आपण विशेष महत्त्व दिले.
शिवसेनेचा निर्णय शेवटच्या दिवशी झाला. तुमचा निर्णय झाला होता तरीसुद्धा पक्षाच्या निर्णयाबरोबर राहिलो, असे खोटे का बोलता? तुम्ही कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेतला म्हणता. मग तुमच्या चार मतदारांपैकी तीन मतदारांची ऊठबस ‘अजिंक्यतारा’वर होती. ते आमदार सतेज पाटील यांच्याबरोबर होते म्हणजे त्यांचे मत पक्के होते. तुम्ही निर्णय घेतल्यानंतर तुमच्या स्वाभिमानी सभापतींनी आमदार सतेज पाटील यांच्यासोबत जाण्याचा योग्य आणि धाडसी निर्णय घेतला. इतकेच नव्हे तर तुमच्या संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षांनी सतेज पाटील यांच्या अभिनंदनाचे डिजिटल फलक नावानिशी लावले. त्यावरून ‘गोकुळ’च्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील यांनी मदत केली आहे; त्यांचे उपकार विसरावयास नको, हे तुमच्या कार्यकर्त्यांचे स्पष्ट मत होते, हे स्पष्ट होते. (प्रतिनिधी)
माझ्या प्रामाणिक प्रयत्नामुळे कोण मला शिल्पकार, किंगमेकर म्हणतो, त्याचा विनयाने मी स्वीकार करतो. त्यामुळे संजय घाटगे यांच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही.