बालकामगार येताहेत शिक्षणाच्या प्रवाहात
By Admin | Published: April 30, 2015 12:41 AM2015-04-30T00:41:12+5:302015-04-30T00:43:10+5:30
बालकामगार विरोधी दिन : १२00 कुटुंबांतील १७00 मुले घेताहेत शिक्षण; ‘अवनि’चे सहकार्य
संदीप आडनाईक - कोल्हापूर प्रत्येक बालकाला शिक्षण हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे २००९ मध्ये सरकारने ठरविले होते. पाच वर्षांनंतर शिक्षणाचा मूलभूत अधिकार हे चित्र दृश्य स्वरूपात दिसत असले तरी यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील वीटभट्टीवरील स्थलांतरित मजुरांची शेकडो बालके आजही मूलभूत शिक्षण हक्कांपासून वंचितच आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांतील १२०० मजूर कुटुंबांचा ‘अवनि’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार केवळ १७०० मुलेच शिक्षणाच्या प्रवाहात असल्याचे स्पष्ट होते आहे. यातील बहुतांश बालके ही कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षण घेत आहेत, ते केवळ अवनी या संस्थेमुळेच. मात्र, इतर दोन्ही जिल्ह्यांत अशा प्रकारची काम करणारी कोणतीही स्वयंसेवी संस्था पुढे आली नसल्यामुळे या दोन जिल्ह्यांतील शिक्षणापासून वंचित असणाऱ्या बालकांची संख्या आणखीन जास्त असण्याची शक्यता आहे.
‘अवनि’ या संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी यासंदर्भात माहिती दिली. अवनी संस्थेने वीटभट्टीवरील कामगार, स्थलांतरित ऊसतोड कामगार, बांधकाम व्यवसायातील स्थलांतरित मजूर आणि महामार्गावरील धाब्यावरील बालकामगारांचे सप्टेंबर महिन्यात सर्वेक्षण केले होते. यामध्ये ० ते ३ वयोगटातील आणि ६ ते १४ वयोगटातील शिक्षणापासून वंचित असणारे १७०० बालकामगारांची नोंद झाली आहे. या सर्वच बालकांना अवनी संस्थेने त्यांच्या बालगृहात तसेच संबंधित ठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यासंदर्भात पुढाकार घेतला. यासंदर्भात आॅक्टोबर महिन्यात अवनी संस्थेने त्यांना प्रवेश मिळवून देण्यात यश मिळविले.
आता यातील काही बालकामगार जिल्हा परिषदेच्या वाकरे, दोनवडे, खुपिरे, सरनोबतवाडी तसेच शिरोळ तालुक्यातील उदगाव आणि चिंचवाड येथील शाळेमध्ये शिकत आहेत. ० ते ३ वयोगटातील बालकामगारांच्या शिक्षणासाठी ‘अवनी’ संस्थेने कोल्हापूर जिल्ह्यातील ३४ ठिकाणी हंगामी बालवाड्या सुरू केल्या आहेत. यामध्ये ७०० मुले शिक्षण घेत असल्याची माहिती अवनी संस्थेचे कार्यकर्ते साताप्पा मोहिते यांनी दिली.
साखरशाळांनाही प्रतिसाद
अवनि संस्थेने सुरू केलेल्या साखरशाळांनाही प्रतिसाद मिळाला आहे. कसबा बावडा येथील राजाराम सहकारी साखर कारखाना परिसरातील ४५ आणि कुडित्रे येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना परिसरात ६ ते १४ वयोगटातील ४७ बालकांनी या हंगामी साखरशाळांमध्ये शिक्षण घेतले.