मेंदूज्वरग्रस्त बालकाला मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:18 AM2021-07-15T04:18:08+5:302021-07-15T04:18:08+5:30
कसबा बावडा : मेंदूज्वराने ग्रस्त असलेल्या ८ वर्षीय बालकावर डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये अत्यंत गुंतागुंतीची यशस्वी शस्त्रक्रिया ...
कसबा बावडा : मेंदूज्वराने ग्रस्त असलेल्या ८ वर्षीय बालकावर डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये अत्यंत गुंतागुंतीची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रतीक हेगडे याला डोकेदुखी, उलटी व झोपेचा त्रास होत. आठवडाभरापूर्वी या मुलाला डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. न्यूरोसर्जन डॉ. उदय घाटे यांनी या मुलाच्या आजाराचे योग्य निदान होण्यासाठी सीटी स्कॅन करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मुलाच्या मेंदूमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे व त्याच्या संसर्गामुळे सतत ताप येत असल्याचे दिसून आले.
मेंदूतील हे अतिरिक्त पाणी काढणे आवश्यक होते. मात्र, ताप व प्रेशरमुळे नेहमीप्रमाणे अंतर्गत नलिकेद्वारे हे पाणी बाहेर काढणे अत्यंत धोकादायक होते. त्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका होता. त्यामुळे तात्पुरत्या बाह्यनलिकेच्या माध्यमातून दररोज ठराविक प्रमाणात पाणी बाहेर काढण्याचा निर्णय डॉ. घाटे व त्यांच्या टीमने घेतला. त्याच जोडीला प्रेशर नियंत्रणासाठी औषधोपचारही सुरू करण्यात आले. अशा प्रकारे संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आल्यावर शस्त्रक्रिया करून अंतर्गत शंट बसवण्यात आला. दोनच दिवसांपूर्वी त्याला डिस्चार्जही देण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेंतर्गत ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली. या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल डॉ. घाटे व सर्व सहकाऱ्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड यांनी अभिनंदन केले.