‘त्या’ बालकाचा अद्यापही ठावठिकाणा लागला नाही
By admin | Published: March 2, 2015 12:22 AM2015-03-02T00:22:27+5:302015-03-02T00:22:27+5:30
अपहरण प्रकरण : संशयित फिरस्त्यांना चौकशी करून सोडून दिले
कोल्हापूर : टाऊन हॉल बागेत खेळत असलेल्या दोन वर्षांच्या बालकाचे अपहरण केल्याच्या संशयावरून लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोन फिरस्त्या महिलांसह चौघांना शनिवारी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता बालकासंदर्भात त्यांच्याकडे कोणतेच धागेदोरे मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांना अखेर सोडून दिल्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ पांचाळ यांनी सांगितले. दरम्यान, गेले सतरा दिवस गायब झालेल्या पोटच्या मुलाच्या विरहाने आई-वडील खचून गेले आहेत.
टाऊन हॉल बागेत दि. १६ फेब्रुवारीला फरान ऊर्फ आयान अकिब जांभारकर (रा. सिद्धार्थनगर) हा मुलगा अन्य मुलांसोबत खेळत असताना भरदुपारी त्याचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी शहरात सर्वत्र चौकशी केली असता, त्याला जळकी राणी या नावाने परिचित असणाऱ्या फिरस्त्या महिलेने पळवून नेल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी मिरज, पंढरपूर, सोलापूर, पुणे आदी रेल्वे स्टेशन परिसरातील भिकाऱ्यांकडे चौकशी केली असता तो मिळून आला नाही. संशयावरून शहरातील वैशाली जाधव, अनिल जाधव, सोनाली पुणेकर, दीपक पुणेकर या फिरस्त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांनी जळकी राणी या महिलेस बालकाला घेऊन जाताना आम्ही पाहिल्याचे सांगितले. त्यानंतर ती कुठे गेली, हे आम्हाला माहीत नसल्याचे सांगितले. तसेच गांधीनगर येथील एका महाराजाच्या सांगण्यावरून तिने बालकास पळवून नेल्याचेही त्यांनी सांगितल्याने पोलिसांनी महाराजाला रात्रीच ताब्यात घेऊन चौकशी केली असता ती महिला गांधीनगर येथे फिरत होती. तिच्याशी आपली ओळख आहे. परंतु गेल्या दीड महिन्यांपासून तिची भेट झाली नसल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे पोलिसांनी महाराजासह चौघा फिरस्त्यांना सोडून दिले. जळकी राणी या महिलेची पोलिसांनी शहरातील फुटपाथसह कसबा बावडा शुगर मिल, शिये, शिरोली एमआयडीसी, आदी ठिकाणी शोधमोहीम सुरू ठेवली