प्रसूतीवेळी बाळ-बाळंतिणीचा मृत्यू

By admin | Published: May 28, 2017 01:12 AM2017-05-28T01:12:37+5:302017-05-28T01:12:37+5:30

डॉक्टरवर हलगर्जीपणाचा आरोप; कसबा बावड्यात नातेवाइकांचा गोंधळ

Childbirth death during delivery | प्रसूतीवेळी बाळ-बाळंतिणीचा मृत्यू

प्रसूतीवेळी बाळ-बाळंतिणीचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क -कोल्हापूर : कसबा बावडा येथील ज्ञानदीप नर्सिंग होममध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा बाळासह उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याच्या संशयातून संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. सुप्रिया सुनील तराळ (वय २५, मूळ रा. पुणे, सध्या रा. टोप, ता. हातकणंगले) असे मृत महिलेचे नाव
आहे.

डॉ. नितीन पाटील व पत्नी डॉ. रश्मी (रा. आंबे गल्ली, कसबा बावडा) या दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतल्यामुळे रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला. अखेर रात्री ११ च्या सुमारास शाहूपुरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करून डॉक्टर दाम्पत्याच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल करून घेतल्यानंतर नातेवाईक शांत झाले.
सुप्रिया तराळ ह्या प्रसूतीसाठी माहेरी टोप येथे आल्या होत्या. वेदना होऊ लागल्याने त्या शुक्रवारी (दि. २६) दुपारी ज्ञानदीप नर्सिग होममध्ये दाखल झाल्या. येथील डॉ. नितीन पाटील यांनी त्यांना तपासून नैसर्गिक प्रसूती करण्याचा सल्ला देत थांबण्यास सांगितले. मात्र, रात्रभर वेदना असह्य झाल्याने नातेवाइकांनी शस्त्रक्रिया करून प्रसूती करण्यास सांगितले. त्यानुसार शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास डॉ. पाटील यांनी सुप्रिया यांना प्रसूतीसाठी शस्त्रक्रिया विभागात नेले. त्यानंतर काही वेळातच शस्त्रक्रिया सुरू असताना तिचा व बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकून नातेवाइकांना धक्काच बसला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलगी व बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी रुग्णालयात गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला. डॉ. पाटील यांनी नातेवाइकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. या वादाची माहिती समजताच शाहूपुरी पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. नातेवाइकांनी डॉ. पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेत गोंधळ घातला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले व सहायक पोलीस निरीक्षक रिजवाना नदाफ यांनी नातेवाइकांची समजूत घालून तक्रार दाखल करून घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मृतदेह सीपीआरमध्ये पाठविण्यात आला. याठिकाणी दोन सरकारी डॉक्टरांसमोर शवविच्छेदन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत अहवाल प्राप्त झाला नव्हता. शवविच्छेदन होईपर्यंत सुप्रियाचे नातेवाईक सीपीआरच्या शवागृहाबाहेर बसून होते.
नातेवाइकांचा आक्रोश
बारावी पास झालेल्या सुप्रिया तराळ हिचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. ती पुण्यात राहत होती. पहिलीच प्रसूती असल्याने ती माहेरी आली होती. तिच्या मृत्यूमुळे रुग्णालयात आई-वडिलांसह नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

सुप्रिया तराळ हिचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला आहे, ते शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट होईल. त्यामध्ये डॉक्टर दोषी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. सध्या तरी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करून नातेवाइकांची तक्रार घेतली आहे.
प्रवीण चौगुले : पोलीस निरीक्षक, शाहूपुरी पोलीस ठाणे.

शवविच्छेदन अहवालात काय कारण येते, त्यानंतर डॉक्टरवर गुन्हा दाखल करु असे आश्वासन शाहुपुरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी दिले आहे. त्यामुळे मृतदेह ताब्यात घेतला.
-सागर बाळासो कोळी, मृत सुप्रियाचा भाऊ

सीपीआर परिसरात तणाव
सुप्रियाचा मृतदेह सीपीआरमध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आला त्यावेळीही नातेवाईक मोठ्या संख्येने सीपीआर परिसरात जमले होते. या ठिकाणीही डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. गुन्हा नोंद केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली. यामुळे सीपीआर परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलीस अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर रात्री अकराच्या दरम्यान नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

Web Title: Childbirth death during delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.