Kolhapur- धक्कादायक! वय अवघे १५ वर्षे, अन् झाली प्रसूती; वय लपवण्यासाठी बनावट आधार कार्डचा आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 12:14 PM2023-02-09T12:14:45+5:302023-02-09T12:17:13+5:30
पोलिसांनीही आधार कार्डवरील जन्मतारीख पाहून काढता पाय घेतला. मात्र, महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी पीडितेच्या नातेवाइकांनी केलेली बनावटगिरी उघडकीस आणली.
कोल्हापूर : अवघ्या १५ वर्षे सात महिने वयाच्या विवाहितेने अर्भकाला जन्म दिल्याचा प्रकार बुधवारी (दि. ८) कसबा बावडा येथील एका खासगी रुग्णालयात घडला. मुलीचे खरे वय लपवण्यासाठी तिच्या नातेवाइकांनी बनावट आधार कार्डचा आधार घेतल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. महिला व बाल विकास विभागाच्या तपासणीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीच्या नातेवाइकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शाहूपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबा बावडा येथील एका खासगी रुग्णालयात अल्पवयीन विवाहितेने अर्भकाला जन्म दिल्याची माहिती मिळाली होती. त्याची पडताळणी करण्यासाठी बुधवारी सकाळी महिला व बाल विकास विभागासह जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने संबंधित रुग्णालयात संयुक्त तपासणी करण्यात आली. त्यावेळी आढळलेल्या संशयित विवाहितेच्या आधार कार्डची पाहणी केली असता, त्यानुसार विवाहितेचे वय १९ वर्ष होते.
मात्र, तिच्या आईला मुलीच्या जन्म तारखेबद्दल ठोस माहिती देता न आल्याने पथकाचा संशय बळावला. पथकातील अधिकाऱ्यांनी संबंधित विवाहिता शिक्षण घेत असलेल्या पलूस (जि. सांगली) येथील मदरशातून जन्म दाखल्याची मागणी केली. त्या दाखल्यानुसार विवाहितेची खरी जन्मतारीख एक सप्टेंबर २००७ असल्याचे स्पष्ट झाले.
बाल संरक्षण अधिकारी सागर दाते, अभिमन्यू पुजारी, महेंद्र कांबळे, अतुल चौगले, अस्मिता पोवार, भाग्यश्री दलवाई, जुबेर शिकलगार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
सासर कर्नाटकात
पीडित मुलीचा विवाह २०२० मध्ये झाला असून, तिचे सासर मंंगसुळी (ता. चिकोडी, जि. बेळगाव) हे आहे. प्रसूतीसाठी ती माहेरी कसबा बावड्यात आली होती. बनावट आधार कार्डच्या सहाय्याने ती गेल्या दोन महिन्यांपासून खासगी रुग्णालयात उपचार घेत होती, अशी माहिती चौकशीत पुढे आली. अल्पवयीन मुलीचा विवाह करून तिला अर्भकाला जन्म देण्यास भाग पाडल्याचा अहवाल महिला व बाल विकास विभागाने बाल कल्याण समितीला सादर केला. त्यानुसार पीडित विवाहितेच्या नातेवाइकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुरू आहे.
नातेवाइकांचा बनाव
कारवाई टाळण्यासाठी पीडित अल्पवयीन विवाहितेच्या नातेवाइकांनी बनावट आधार कार्ड तयार करून घेतले होते. बुधवारी पथकाने चौकशी केली असता, नातेवाइकांना ठामपणे विवाहितेचे वय १९ असल्याचे सांगितले. पोलिसांनीही आधार कार्डवरील जन्मतारीख पाहून काढता पाय घेतला. मात्र, महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी पीडितेच्या नातेवाइकांनी केलेली बनावटगिरी उघडकीस आणली.