क्षणिक रागात होरपळले कोवळ्या जिवांचे बालपण--कोल्हापूर शुक्रवार पेठेतील आई-वडिलांच्या मृत्यूनंतर गणेश आणि करणचे पुढे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 01:20 AM2017-11-17T01:20:46+5:302017-11-17T01:24:03+5:30
कोल्हापूर : पती-पत्नी आणि दोन गोंडस मुले असे हे चौकोनी कुटुंब, चांदी कारागिरीचा धंदा असल्याने आर्थिकदृष्ट्याही सक्षम, चांगले दुमजली घर, अशा या रेशमी घरट्याला वडिलांच्या क्षणिक रागाचे ग्रहण लागले.
इंदुमती गणेश ।
कोल्हापूर : पती-पत्नी आणि दोन गोंडस मुले असे हे चौकोनी कुटुंब, चांदी कारागिरीचा धंदा असल्याने आर्थिकदृष्ट्याही सक्षम, चांगले दुमजली घर, अशा या रेशमी घरट्याला वडिलांच्या क्षणिक रागाचे ग्रहण लागले. त्या घटनेत झालेल्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर गणेश आणि करण लहानग्या भावंडांच्या बावरलेल्या आणि पाणावलेल्या नजरा मोठ्यांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावून जातात. पालक नसले तरी मुलं मोठी होतातच, पण प्रश्न आहे तो अचानक आई-वडिलांच्या हरवलेल्या छत्रछायेचा आणि मनावर कायमस्वरूपी उठलेल्या ओरखड्यांचा. आता या मुलांचे पुढे काय? हा प्रश्न प्रत्येक संवेदनशील माणसाला सतावत राहतो.
शुक्रवार पेठेतील जैन मठासमोरील बोळात राहत असलेले चांदी व्यावसायिक सुभाष कुंभार यांनी पत्नीचा खून करून आत्महत्या केली. त्यामागे कारण कोणतेही असले तरी या क्षणिक रागाने दोन निरागस भावंडांच्या डोक्यावरील आई-वडिलांचे मायेचे छत्र हिरावून घेतले आहे. आई-वडिलांच्या निधनाचे दु:ख, त्यानंतर सुरू झालेल्या चर्चा, तुला कधी कळलं आई-वडील सारखे भांडायचे का? तुला काही बोलले होते का? असे पोलिसांसह परिसरातील नागरिक, नातेवाइकांचे प्रश्न आणि भेटायला येणाºयांच्या सहानुभूतीने हळहळणाºया नजरांचा सामना करणाºया निरागस नजराही न बोलता खूप काही बोलून जातात. या घटनेनंतर त्यांच्या घराला कुलूप असून, दोन्ही मुलं काकांच्या घरी आहेत.
सुभाष कुंभार यांना तीन मोठे भाऊ असून, ते तिघेही एकमेकांच्या शेजारी राहतात. विटा तयार करणे, हा त्यांचा मूळ व्यवसाय. मात्र, शेजारी राहणाºया चांदी कारागिरांमुळे त्यांनीही व्यवसाय बदलला आणि चारही भावांनी चांदी व्यवसायात जम बसविला. सुभाष कुंभार तेवढे जैन गल्लीत राहायचे. मोठा मुलगा करण हा विवेकानंद शाळेत इयत्ता सातवीत, तर लहान करण हा खर्डेकर शाळेत पाचवीत शिकतो. लहान दीर आणि जावेच्या मृत्यूच्या धक्क्यातून अजूनही न सावरलेल्या काकींनी ‘आता आम्ही सगळे मिळून मुलांचा सांभाळ करू,’ तर काकांनी, ‘बघू, आमच्यात चर्चा होऊन मुलांचे काय करायचे ते ठरवू,’ असे सांगितले.
पालकांनी टाकून दिलेली अगदी एक दिवसाची, अनाथपण वाट्याला आलेली मुलंही मोठी होतात. कोणत्या ना कोणत्या नातेवाइकांकडून, संस्थांकडून त्यांचा सांभाळ केला जातो. प्रश्न राहतो तो अशा दुर्दैवी घटनांमुळे अचानक आई-वडिलांचे प्रेम, माया, आईची उबदार कूस आणि वडिलांची आदरयुक्त भीती, लाडिक हट्ट, घेतली जाणारी काळजी या हरवलेल्या छायाछत्राचा आणि मनावर उठलेल्या ओरखड्यांचा.
कोल्हापुरात आई-वडिलांच्या मृत्यूनंतर काकांच्या घरी असलेली गणेश आणि करण ही लहान भावंडे गुरुवारी अशी बावरलेली होती. काका-काकी, इतर भावंडं असली तरी आता त्यांना आई-वडील कधीच दिसणार नाहीत. पालकांना आलेल्या क्षणिक रागात मुलांचे हे होरपळलेले बालपण इतर कोणत्याही व्यक्तींनी न भरून येणार आहे.