बालसाहित्याने दृक्श्राव्य माध्यमात यावे: लवटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:34 AM2018-11-12T00:34:44+5:302018-11-12T00:34:52+5:30
कोल्हापूर : बालसाहित्याने मुद्रित माध्यमांसह दृक्श्राव्य माध्यमात यायला हवे. जगभर या क्षेत्रात काय चालले आहे, त्याचे भान बालसाहित्यिकांना हवे. ...
कोल्हापूर : बालसाहित्याने मुद्रित माध्यमांसह दृक्श्राव्य माध्यमात यायला हवे. जगभर या क्षेत्रात काय चालले आहे, त्याचे भान बालसाहित्यिकांना हवे. हे साहित्य ९९ टक्के बालककेंद्रित आणि एक टक्का पालककेंद्रित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी रविवारी येथे केले.
येथील रवळनाथ हौसिंग क्रेडिट सोसायटीमध्ये आजरा येथील चैतन्य सृजन व सेवा संस्था आणि बालमित्र समूहातर्फे आयोजित बालसाहित्य परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्यांचे बीजभाषण झाले. यावेळी ज्येष्ठ बालसाहित्यिक राजीव तांबे प्रमुख उपस्थित होते. डॉ. लवटे म्हणाले, जग, भारत, महाराष्ट्र आणि मराठी भाषा असा फेर घेत बालकांसाठी सर्व काहीचा धांडोळा घेताना जे काही हाती येते, ते खिन्न करणारे आहे. म्हणूनच भविष्यात देश आणि समाजाने बालककेंद्री विकास असे ध्येयधोरण अंगीकारले पाहिजे. मराठीत बालसाहित्यिकांची पिढी अजून जुन्या लेखनशैलीत अडकली आहे. त्यास लेखकांसह प्रकाशक, पालक, समाज जबाबदार आहे. हे पिढीतील अंतर मिटायलाच पाहिजे.
ज्येष्ठ बालसाहित्यिक तांबे म्हणाले, मराठीतील बालसाहित्य इतर भाषांमध्ये पोहोचविण्याची गरज आहे. बालसाहित्य निर्मितीत दिव्यांग, विशेष गरजा असणाऱ्या बालकांचा विचार व्हावा. या कार्यक्रमात सावित्री जगदाळे लिखित ‘आज्जोपिझ्झा’, किशोर पाठक लिखित ‘टिंबाच्या कविता’ या पुस्तकांचे प्रकाशन प्रमुख उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशांत गौतम, गोविंद गोडबोले, बाळ पोतदार, प्रकाश क्षीरसागर, आदींसह महाराष्ट्र, गोव्यातील बालसाहित्यिक, लेखिका, लेखक उपस्थित होते. ‘चैतन्य सृजन’चे अध्यक्ष डॉ. शिवशंकर उपासे यांनी स्वागत केले. ते म्हणाले, बालसाहित्य एका विशिष्ट टप्प्यावर आले आहे. आता आपण नवीन शक्यतांचा विचार करायला हवा. सुभाष विभूते यांनी सूत्रसंचालन केले. सुनील सुतार यांनी आभार मानले. दरम्यान, उद्घाटनानंतरच्या सत्रात खुली चर्चा आणि पुढील कार्याचे नियोजन केले.
महाराष्ट्र बालसाहित्य परिषदेची स्थापना
परिषदेमध्ये महाराष्ट्र बालसाहित्य परिषदेची स्थापना केली. परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. राजीव तांबे, उपाध्यक्षपदी डॉ. शिवशंकर उपासे, सचिवपदी सुभाष विभूते, खजिनदारपदी चंद्रकांत निकाडे यांची निवड केली. यावेळी डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी परिषदेसाठी एक लाखाची देणगी जाहीर केली.