कल्पनेच्या कुंचल्यात रंगली मुले
By Admin | Published: January 18, 2016 12:18 AM2016-01-18T00:18:56+5:302016-01-18T00:29:34+5:30
भिमा फेस्टिव्हल : ‘रंग उमलत्या मनाचे’ चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद
कोल्हापूर : सकाळच्या बोचऱ्या थंडीत चित्र काढण्यासाठी लगबग, चिमुकल्यांची भिरभिरती नजर, लांबून पाहणारे पालक आणि बालकलाकारांच्या भावविश्वातील विविध आविष्कार कुंचल्यांच्या साहाय्याने चित्ररूपात कागदावर साकारले. निमित्त होते ‘भिमा फेस्टिव्हल’ अंतर्गत ‘रंग उमलत्या मनाचे’ चित्रकला स्पर्धेचे.
हुतात्मा पार्क येथे रविवारी ‘चॅनेल बी’च्या वर्धापन दिनानिमित्त भिमा फेस्टिव्हल अंतर्गत ‘रंग उमलत्या मनाचे’ चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक व अरुंधती महाडिक यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महापालिकेतील विरोधी पक्षनेते संभाजी जाधव, सुहास लटोरे, रामराजे कुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेत सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
चित्रकला स्पर्धेसाठी सकाळी साडेआठ वाजल्यापासून मुलांची लगबग सुरू झाली. पक्ष्यांचा किलबिलाट व मुलांच्या आवाजाने परिसरात वेगळाच उत्साह निर्माण झाला होता. चित्रे काढण्यासाठी मुले रंग-रेषांच्या दुनियेत हरवून गेली. ‘ए, मी छोटा भीम काढते, तू फुलांचे काढ वाटल्यास, नदीचे पाणी जरा रंगीत कर,’ असे एकमेकांना ती उत्साहाने सांगत होती. या स्पर्धेसाठी एकूण सात गट होते. यामध्ये सुमारे दहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.
याप्रसंगी अभिषेक जोशी, स्वप्निल दळवी, गौरव कार्इंगडे, अभिजित पडळकर या कलाकारांचा खासदार महाडिक यांच्या हस्ते सत्कार झाला. या कलाकारांनी साकारलेल्या कलाविष्काराचा अनुभव उपस्थितांना पाहायला मिळाला.
स्पर्धेचे संयोजन सागर बगाडे, अनिल अहिरे, आदित्य शेटे यांनी केले होते. याप्रसंगी नगरसेवक सत्यजित कदम, नगरसेवक ईश्वर परमार, सुनील कदम, किरण शिराळे, शेखर कुसाळे, किरण नकाते, राजश्री शेळके, राजू दिंडोर्ले, संतोष गायकवाड, सुनंदा मोहिते, संग्राम निकम, माधुरी नकाते, मिलिंद धोंड, रियाज सुभेदार, शिवतेज शिवसृष्टी - वॉटर पार्कचे योगेश भारती, प्रशांत शेटे, उदयसिंह पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
सात गटांत स्पर्धा :
पहिली व दुसरी, तिसरी व चौथी, पाचवी व सहावी, सातवी व आठवी, नववी व दहावी, अपंग, मतिमंद व गतिमंद असे गट होते. यामध्ये पहिली व दुसरी गटासाठी फ्लॉवरपॉट आणि कोणताही देखावा हे विषय होते. तिसरी आणि चौथीच्या गटासाठी वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान, पाचवी आणि सहावीच्या गटासाठी चित्रकला स्पर्धा आणि डोंबाऱ्याचा खेळ, सातवी आणि आठवीच्या गटासाठी अभयारण्य आणि प्रयोगशाळेतील दृश्य, तर नववी आणि दहावीसाठी - मंदिरातील एक प्रसंग आणि मूर्ती बनविणारे शिल्पकार असे विषय होते. मूकबधिर आणि गतिमंद गटासाठी समुद्रकिनारी खेळणारी मुले, सांस्कृतिक कार्यक्रम, माझं कोल्हापूर, छत्रपती शिवरायांच्या जीवनातील एक प्रसंग; तर अपंग गटासाठी पाणी वाचवा आणि निसर्गचित्र असे विषय होते.