क्रांतिकारकांचे वंशज मंगळवारी साधणार कोल्हापूरकरांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 11:29 AM2019-03-29T11:29:27+5:302019-03-29T11:37:56+5:30
देशप्रेम, त्याग आणि निष्ठेचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या शहीद भगतसिंग, राजगुरूआणि सुखदेव या क्रांतिकारकांचे वंशज मंगळवारी (दि. २ एप्रिल) कोल्हापूरकरांशी संवाद साधणार आहेत. त्यामध्ये भगतसिंग यांचे पुतणे अभयसिंग, राजगुरूयांचे नातू सत्यशील राजगुरू, सुखदेव यांचे नातू आनुज थापर यांचा समावेश आहे.
कोल्हापूर : देशप्रेम, त्याग आणि निष्ठेचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या शहीद भगतसिंग, राजगुरूआणि सुखदेव या क्रांतिकारकांचे वंशज मंगळवारी (दि. २ एप्रिल) कोल्हापूरकरांशी संवाद साधणार आहेत. त्यामध्ये भगतसिंग यांचे पुतणे अभयसिंग, राजगुरूयांचे नातू सत्यशील राजगुरू, सुखदेव यांचे नातू आनुज थापर यांचा समावेश आहे.
‘क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांशी संवाद’ हा कार्यक्रम राजर्षी छत्रपती शाहू खासबाग मैदानात सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत होणार आहे, अशी माहिती भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे आणि संयोजन समितीचे जितेंद्र बामणे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
राहुल चिकोडे म्हणाले, शहीद दिनानिमित्त भालचंद्र चिकोडे ग्रंथालय, साथी फौंडेशन, वूई कॅन फौंडेशन आणि मराठा रणरागिणी या संस्थांतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने क्रांतिकारकांचे हे वंशज पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत. या कार्यक्रमात शहीदांवरील चित्रफीत दाखविण्यात येईल.
देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. जितेंद्र बामणे म्हणाले, क्रांतिकारकांच्या वंशज हे सोमवारी (दि. १ एप्रिल) सायंकाळी सहा वाजता ताराराणी चौकात येतील. तेथून त्यांना रॅलीने शहरात आणण्यात येईल. मंगळवारी (दि. २) सकाळी अंबाबाई मंदिर, मोतीबाग तालीम, न्यू पॅलेसला ते भेट देतील.
सायंकाळी खासबाग मैदानातील कार्यक्रमाला उपस्थित राहतील. बुधवारी (दि. ३) सकाळी कणेरी येथील सिद्धगिरी मठाला भेट देऊन दुपारी ते पुण्याला रवाना होतील. या पत्रकार परिषदेस पारस ओसवाल, निखिल शिंदे, सीमा पाटील, मनीषा जाधव, आदी उपस्थित होते.