लहान मुलांनी गिरवले ‘फिजिओथेरपी’चे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:28 AM2021-08-14T04:28:45+5:302021-08-14T04:28:45+5:30
कोल्हापूर : लहान मुलांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणाऱ्या कोल्हापुरातील ‘रगेड कब’ या किड्स फिटनेस ॲकॅडमी आणि ‘लोकमत बालविकास मंच’च्यावतीने ...
कोल्हापूर : लहान मुलांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणाऱ्या कोल्हापुरातील ‘रगेड कब’ या किड्स फिटनेस ॲकॅडमी आणि ‘लोकमत बालविकास मंच’च्यावतीने लहान मुलांसाठी आयोजित फिजिओथेरपी कार्यशाळेचा शुक्रवारी प्रारंभ झाला. दुपारी बारा ते चार यावेळेतील विनामूल्य कार्यशाळेत ३ ते १६ वर्षे वयोगटातील सुमारे शंभर मुले-मुलींनी सहभाग घेत फिजिओथेरपीचे धडे गिरवले. आज (शनिवारी) या कार्यशाळेचा अखेरचा दिवस आहे.
डिसेंबरमध्ये ‘रगेड कब’ची सुरूवात झाली. लहान मुलांची शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी रोज नियमितपणे व्यायाम आणि क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण देणारी ही संस्था आहे. जन्मजात किंवा नंतर लहान मुलांमध्ये काही हाडांचे आजार उद्भवतात. त्यामध्ये शरिराची ठेवण नीट नसणे, पाठीला बाक येणे, उभे राहिल्यानंतर दोन गुडघ्यांमध्ये अंतर नसणे, मानेचे विकार, हाता-पायाची हाडे ठिसूळ असणे, गुडघ्यामधून आवाज येणे यांचा समावेश आहे. धावपळीच्या जगात पालकांकडूनही अशाप्रकारच्या आजारांकडे दुर्लक्ष होते. पण, कालांतराने हे आजार जास्त प्रमाणात बळावतात आणि या मुलांना मोठ्या शारीरिक समस्यांना पुढे जाऊन सामोरे जावे लागते. त्यांचे दैनंदिन काम ते नीट करू शकत नाहीत. एखाद्या मुलाला क्रीडा विश्वात आपले नाव उंचवायचे असेल, तर लहान वयातच या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्याने लहान मुलांमध्ये अनेक शारीरिक आजारांची निर्मिती झाली आहे. सतत मोबाईलसमोर एका ठिकाणी बसून पाठ, मानेचे आजार उद्भवू लागले आहेत. यासाठी आधीच प्रतिबंधात्मक उपाय करणे अतिशय गरजेचे आहे. याबाबत पालकांमध्ये याबद्दल जनजागृती होण्यासाठी या मोफत फिजिओथेरपी कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे ‘रगेड कब’चे प्रमुख आकाश कोरगावकर यांनी सांगितले. फिजिओथेरपिस्ट डॉ. प्रांजली धामणे आणि डॉ. ऋषिकेश जाधव या तज्ज्ञांनी कार्यशाळेतील सहभागी लहान मुलांची संपूर्ण शारीरिक तपासणी केली. आहार आणि साधे, सोपे व्यायाम प्रकारांबाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी डॉ. काजल काळे, डॉ. भक्ती घोलकर यांचे सहकार्य लाभले.
चौकट
नावनोंदणीसाठी येथे संपर्क साधा
या कार्यशाळेचा लाभ जास्तीत जास्त पाल्यांनी घ्यावा, असे आवाहन आकाश कोरगावकर यांनी केले. नावनोंदणीसाठी (७७२२०६७४७७/९८३४९५०१६६) या क्रमांकावर किंवा रगेड कब (सासने ग्राऊंडजवळ, वायल्डर मेमोरियल चर्चच्यामागे, ताराबाई पार्क, कोल्हापूर) येथे संपर्क साधावा.
फोटो (१३०८२०२१-कोल-फिजिओथेरपी कार्यशाळा) : कोल्हापुरात शुक्रवारी ‘रगेड कब’ या किड्स फिटनेस ॲकॅडमी आणि ‘लोकमत बालविकास मंच’च्यावतीने आयोजित फिजिओथेरपी कार्यशाळेचा शुक्रवारी प्रारंभ झाला. त्यात फिजिओथेरपिस्ट डॉ. प्रांजली धामणे आणि डॉ. ऋषिकेश जाधव यांनी लहान मुला-मुलींची तपासणी केली.
लोगो वापरावा (१३०८२०२१-कोल-लोकमत बालविकास मंच लोगो)