बाचणीत शुक्रवारपासून बाल गट व्हॉलिबॉल स्पर्धा
By admin | Published: September 29, 2015 12:08 AM2015-09-29T00:08:46+5:302015-09-29T00:09:34+5:30
रविवारी समारोप : राज्य संघाची होणार निवड
मुरगूड : महाराष्ट्र राज्य व्हॉलिबॉल संघटनेच्या मान्यतेने व आदर्श क्रीडा मंडळ आणि दिशा अकॅडमी बाचणी यांच्या विद्यमाने २ ते ४ आॅक्टोबरअखेर बाचणी (ता. कागल) येथे राज्यस्तरीय अंडर- १४ (बाल गट) व्हॉलिबॉल अजिंक्यपद शासकीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी राज्यातून कोल्हापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, लातूर, नाशिक, अमरावती, नागपूर या आठ विभागांतून मुला, मुलींचे १६ संघ सहभागी होणार आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या व्हॉलिबॉल संघाची निवड करण्यात येणार असल्याची माहिती स्पर्धा संयोजक व राष्ट्रीय प्रशिक्षक अजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्पर्धेसाठी विद्युतझोतातील दोन सुसज्ज मैदाने तयार करण्यात आली आहेत. दोन ते तीन हजार पे्रक्षक बसू शकतील, अशा गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी राज्याचा संघ निवडण्यासाठी भारतीय व्हॉलिबॉल् संघटनेचे उपाध्यक्ष व राज्य संघटनेचे अध्यक्ष विजय डांगरे, सचिव प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते दिलीप जोशी, सुनील हांडे उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेसाठी २०० खेळाडू, ४० पंच, निवड समितीचे सदस्य, तांत्रिक समितीचे सदस्य, स्वयंसेवक आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)
हसन मुश्रीफ उदघाटक
स्पर्धेचे उद्घाटन २ आॅक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता आमदार हसन मुश्रीफ, शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, सरपंच सूर्यकांत पाटील, पांडुरंग पाटील, शशिकांत कुलकर्णी यांच्या उपस्थितीत होणार आहे. बक्षीस वितरण ४ आॅक्टोबर रोजी सायंकाळी जि. प.च्या अध्यक्षा विमल पाटील, कोल्हापूरच्या महापौर वैशाली डकरे, जि. प. सदस्य परशुराम तावरे यांच्या हस्ते पार पडणार आहे.