रुग्णसेवेतून साजरा केला मुलाचा वाढदिन
By Admin | Published: December 29, 2014 09:49 PM2014-12-29T21:49:28+5:302014-12-29T23:40:10+5:30
किमान एक दिवस तरी त्यांचा भार मी थोडासा हलका करु शकलो याचे मला समाधान आहे
गुहागर : कोणताही डामडौल न करता गुहागर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्याने रुग्णालयातील रुग्णाचा एक दिवसाचा खर्च स्वत:च्या खिशातून करत आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा केला.लहान असो वा थोर, गरीब वा श्रीमंत आपल्या मुलांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. सुक्या, ओल्या पार्ट्या करुन आनंद साजरा केला जातो. नेते आणि पुढाऱ्यांच्या वाढदिवसांची तर तऱ्हाच निराळी! त्यांच्या वाढदिवसाचा त्यांच्यापेक्षा सर्वसामान्यांनाच मोठा भुर्दंड बसतो. आजच्या परिस्थितीत गुहागर ग्रामीण रुग्णालयातील लिपिकाने आपल्या छकुल्याचा वाढदिवस अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा केला आणि इतरांनाही वेगळा विचार करावयास भाग पाडले आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या जवळपास १२५पेक्षा जास्त रुग्णांचा भार या लिपिकाने पेलला. ग्रामीण रुग्णालयाचे लिपिक दीपक चव्हाण यांनी सोमवारी त्यांचा मुलगा प्रथमेश चव्हाण याचा वाढदिवस साजरा करताना ग्रामीण रुग्णालयात या दिवशी उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांचे शुल्क आपल्या स्वत:च्या खिशातून अदा केले. तालुक्यातील दुर्गम भागातून रुग्ण येथे येतात. चव्हाण यांच्या या कृतीतून बोध घेऊन आपल्यातील थोडथोडके नागरिक तरी अशा सत्कर्मासाठी पुढे आले तर मोठे समाजकार्य उभे राहील. चव्हाण यांच्या सत्कार्याबद्दल रुग्णालय अधीक्षक कांचन रेडीयार यांनी त्यांचे कौतुक केले. (वार्ताहर)
अनेकांची परिस्थिती हलाखीची असल्याचे आपण येथे काम करताना पाहिले आहे. मी त्यांच्यासाठी फार मोठे काही करु शकत नसलो तरी किमान एक दिवस तरी त्यांचा भार मी थोडासा हलका करु शकलो याचे मला समाधान आहे
- दिपक चव्हाण, लिपिक.