पाण्याच्या बादलीत पडून बालकाचा मृत्यू
By admin | Published: December 5, 2015 12:31 AM2015-12-05T00:31:32+5:302015-12-05T00:43:56+5:30
शिवाजी विद्यापीठातील हृदयद्रावक घटना
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील पाळणाघरात खेळताना पाण्याच्या बादलीत पडून शुक्रवारी दुपारी दीड वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रणजय उत्तम सुर्वे (रा. शिवाजी विद्यापीठ) असे त्याचे नाव आहे. मृत रणजय हा विद्यापीठातील मुख्य लेखापाल उत्तम हणुमंत सुर्वे यांचा मुलगा आहे.याबाबत अधिक माहिती अशी, उत्तम सुर्वे यांचे मूळ गाव दुधोंडी (ता. पलूस, जि. सांगली) आहे. ते कुटुंबासह विद्यापीठातील शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी राहतात. त्यांच्या पत्नी प्राजक्ता या गृहिणी आहेत. त्यांना रणजय, नील व मुलगी राधा ऊर्फ मृणाल अशी तीन जुळी मुले आहेत. नील हा आजोळी आष्टा येथे असतो. रणजय व मृणाल सकाळी घरी खेळत होती. दोन मुले सांभाळणे कठीण असल्याने प्राजक्ता या मुलांना विद्यापीठातील (पान १० वर) ‘डे केअर सेंटर’ या पाळणाघरात ठेवतात. या ठिकाणी नेहमी १२ मुले असतात. त्यांना सांभाळण्यासाठी दोन आया आहेत. दरम्यान, शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास उत्तम सुर्वे हे कार्यालयात गेले. त्यानंतर काही वेळाने प्राजक्ता या रणजय याला पाळणाघरात सोडून घरी आल्या. दुपारी चारच्या सुमारास रणजय हा खेळत असताना पाळणाघरातील पाण्याच्या बादलीत पडला. त्याच्याकडे कोणाचेच लक्ष नसल्याने सुमारे अर्धा तास तो पाण्यात पडून होता. आया गार्गी कुडाळकर हिने हा प्रकार पाहिला. त्यानंतर तिने त्याला बादलीतून बाहेर काढून प्राजक्ता यांना फोन करून बोलावून घेतले. त्यांनी निपचित पडलेल्या बाळाला विद्यापीठातील केअर सेंटरमध्ये दाखविले असता तेथील डॉक्टरांनी त्याची प्रकृती अत्यवस्थ असून त्याला खासगी रुग्णालयात नेण्यास सांगितले. तेथून त्याला राजारामपुरीतील खासगी रुग्णालयाते नेल्यावर तिथे त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोटच्या गोळ्याचा मृतदेह पाहून आई-वडिलांना मानसिक धक्काच बसला. दोघांनाही अश्रू अनावर झाले. तेथून मृतदेह सीपीआर रुग्णालयात विच्छेदनासाठी आणला. या ठिकाणी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. (प्रतिनिधी)
‘आयां’कडे
कसून चौकशी
पाळणाघरात जिथे मुले खेळतात, तिथे पाण्याची बादली कोणी भरून ठेवली होती. तिथे दोन आया बालकांचा सांभाळ करतात. रणजय हा खेळत असताना त्या कोठे गेल्या होत्या? या संपूर्ण प्रकरणाची चौकशी विद्यापीठ प्रशासन त्या दोन आयांकडे रात्री उशिरापर्यंत करीत होते.
पाळणाघराकडे धाव
पाळणाघरात पाण्याच्या बादलीत पडून बालकाचा मृत्यू झाल्याची वार्ता विद्यापीठ परिसरात समजताच अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी पाळणाघराकडे धाव घेतली. या ठिकाणी १२ मुले असल्याने सर्वांच्याच आई-वडिलांच्या जिवाची घालमेल झाली होती.