आई-वडिलांकडूनच मुलाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 01:18 AM2019-05-13T01:18:18+5:302019-05-13T01:18:24+5:30
पेठवडगाव : मनपाडळे (ता. हातकणंगले) येथे सापडलेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटविण्यात वडगाव पोलिसांना यश आले आहे. तो मृतदेह टोप ...
पेठवडगाव : मनपाडळे (ता. हातकणंगले) येथे सापडलेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटविण्यात वडगाव पोलिसांना यश आले आहे. तो मृतदेह टोप येथील अनिकेत अरुण वाळवेकर (वय २४, रा. पाटील टेक, टोप, ता. हातकणंगले) याचा असल्याचे उघड झाले आहे.
मद्यप्राशन करून शिवीगाळ व दोन लाख रुपयांची मागणी करीत कुटुंबीयांना त्रास दिल्याच्या त्राग्यातून आई-वडिलांनी विषारी द्रव्य पाजले. त्यानंतर मानलेल्या दोन मामांनी गळा दाबून अनिकेतचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलीसह सूरज रामचंद्र ठाणेकर (२५, रा. बोरूडकर गल्ली), बबलू ऊर्फ अविनाश अनिल जगताप (२२, रा. क्रशर रोडजवळ), अभिजित दिनकर सूर्यवंशी (२६, रा. मनपाडळे), वडील अरुण सखाराम वाळवेकर (५४), आई रेखा अरुण वाळवेकर (४५ , दोघे रा. पाटील टेक, टोप) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोप गावाजवळच्या पाटील टेक येथे अरुण सखाराम वाळवेकर हे दोन मुली व एक मुलगा, पत्नीसह राहतात. त्यांचा मुलगा अनिकेत ऊर्फ अभिजितला दारूचे व्यसन होते. काही महिन्यांपूर्वी स्वत:चा डंपर विकून तो दुसऱ्याच्या ट्रकवर चालक म्हणून काम करत होता. अनिकेत सातत्याने मद्यपान करून घरात दोन लाखांची मागणी करून भांडण काढत होता. शनिवारी (दि. ४) रात्री आठच्या सुमारास तो पुन्हा मद्यपान करून घरी आला. डंपर घेण्यासाठी वडिलांकडे दोन लाखांची मागणी करू लागला. त्यावरून त्यांच्यात भांडण सुरू झाले. त्यामुळे घरात गोंधळ सुरू झाला. अनिकेत घरातील विष औषध म्हणून पाजले, असा आरडाओरड करू लागला.
दरम्यान, शिरोली एमआयडीसीहून रेखा यांचे माहेरचे मानलेले भाऊ सूरज व अविनाश हे मनपाडळेकडे जात होते. वाळवेकर यांच्या घरातील गोंधळ ऐकून ते तिथे आले. यावेळी त्यांनी अनिकेतला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने जोरदार गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दोघा मामांनी त्याचा गळा दाबला त्यात अनिकेतचा मृत्यू झाला. त्यानंतर संशयितांची भंबेरी उडाली. त्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याबाबत त्यांनी चर्चा केली. सूरज, अविनाश हे मनपाडळे गावी आले आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अभिजीत सूर्यवंशी या मित्राची मदत घेतली. रात्री एक वाजता तिघेजण टोप येथे आले आणि मोटारसायकलवरून दोघांमध्ये मृतदेह बसवून मनपाडळे-अंबपवाडी रस्त्यावर आणला. त्याठिकाणी त्यांनी हात, पाय, गळाला दोरी, दगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला.
————————-
आर्थिक वादाच्या त्रासामुळे हत्या
अभिजितने अनेक वेळा विविध वाहने विकत घेतली होती. हप्ते नियमित न भरल्यामुळे घरच्यांना दहा ते पंधरा लाख रुपयांचा तोटा झाला होता. त्याने कर्ज केले होते. आता नवीन वाहन घेण्यासाठी दोन लाख मागत होता. वारंवार पैसे मागण्याच्या त्रासातून खून झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
खबºयाकडून मिळाली टीप
बुधवारी (दि. ८) मृतदेह पाण्यावर आला. या खुनाचे गूढ उलघडणे पोलिसांसमोर आव्हान होते. पोलिसांनी मृतदेहाची माहिती देण्यासाठी २५ हजारांचे बक्षीसही जाहीर केले होते. चार पथके करून शोध घेत होते. अखेरीस एका खबºयाने टोप येथील पाटील टेक परिसरात राहणारा युवक बेपत्ता झाल्याची माहिती दिली. मात्र, याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार झालेली नव्हती. पोलिसांना याविषयी संशय बळावल्यानंतर त्याची
पडताळणी केली तसेच वाळवेकर कुटुंबीयांच्यावर पाळत ठेवण्यात
आली. यावेळी त्यांना संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची
कबुली दिली. या गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा पोलीस निरीक्षक प्रदीप काळे,
साहाय्यक फौजदार बालाजी घोळवे, पोलीस नाईक विकास माने, दादा
माने, नंदू घुगरे, विशाल हुवळे,
रणवीर जाधव, पल्लवी यादव, धनश्री पाटील, प्रियांका जामदार, आदींनी
तपास केला.