‘ओकजा’ चित्रपटाला चिल्लर पार्टीचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 06:27 PM2017-07-23T18:27:43+5:302017-07-23T18:27:43+5:30
सुधाकरनगर झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांचा सहभाग
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि.२३ : चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीतर्फे चालणाऱ्या बालचित्रपट चळवळीअंतर्गत रविवारी दक्षिण कोरियाचा ‘ओकजा’ हा चित्रपट दाखविण्यात आला. हा चित्रपट पाहण्यासाठी बच्चेकंपनीने शाहू स्मारक भवन येथे गर्दी केली. महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या सुधाकर नगर परिसरातील बालदर्शक या चित्रपटाला आवर्जून उपस्थित होते.
लहान मुलांमध्ये देश-विदेशातील चित्रपट पाहण्याची आवड जोपासावी म्हणून दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीमार्फत बालचित्रपट दाखविण्यात येतात. या उपक्रमांतर्गतच ‘ओकजा’ हा चित्रपट दाखविण्यात आला. १९ मे २0१७ रोजी प्रदर्शित झालेला दक्षिण कोरियाच्या या अॅक्शन आणि साहसी चित्रपटातून पर्यावरण कार्यकर्त्याची झुंज आणि त्याला एका शेतकऱ्याच्या मुलीने दिलेली साथ यांचा प्रवास मांडला आहे. एका प्रयोगाने डुकरांची २६ पिल्ली तयार करून ती वेगवेगळ्या देशांत पाळण्यासाठी पाठविली जातात. कोरियातील एका शेतकऱ्याकडे पाठविण्यात आलेल्या डुकराची शेतकऱ्याच्या मिजा या दहा वर्षांच्या मुलीशी जिवाभावाची मैत्री होते. मात्र संबंधित कंपनीकडून ओकजाचा वापर करून प्रयोगशाळेत या प्राण्यांवर कसा अन्याय केला जातो हे सत्य जगासमोर आणण्याचा प्लॅन प्राणिमित्र संघटनेकडून केला जातो. मात्र कंपनीच्या कत्तल करण्याच्या कचाट्यात ओकजा सापडते. ओकजाला सोडविण्यासाठी मिजा या कंपनीसोबत लढा देते, असे या चित्रपटाचे कथानक आहे.
बाँग जून हो यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची बाँग आणि जॉन रोनसन यांची पटकथा आहे. दक्षिण कोरियाची बालकलाकार आन स्यू ह्यूनची यात प्रमुख भूमिका आहे. याशिवाय हॉलिवूडच्या गाजलेल्या अभिनेत्यांची यात भूमिका आहे. २0१७ च्या कान्स फिल्म फेस्टिव्हल्समध्ये हा चित्रपट मुख्य चित्रपटांच्या स्पर्धेत होता.
चिल्लर पार्टीच्या या उपक्रमात दरवेळेस सुधाकरनगर झोपडपट्टीतील मुलांचाही सहभाग असतो. याहीवेळेस ही लहान मुले आवर्जून हा चित्रपट पाहण्यासाठी उपस्थित होते.