मिरचीचा ठसका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:02 AM2018-04-09T01:02:57+5:302018-04-09T01:02:57+5:30
कोल्हापूर : गतवर्षीपेक्षा यंदा लाल मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. त्यातच चटणीसाठी लागणाऱ्या मसाल्याच्या साहित्यदरामध्ये कमालीची वाढ झाल्याने ग्राहकांना मिरचीचा ठसका लागला आहे. लिंबूच्या दरातही वाढ झाली आहे. दहा रुपयांना पाच लिंबू असा दर होता. भाज्यांची आवक वाढल्याने दरावर परिणाम झाला आहे. पण, तीन दिवसांपूर्वी झालेल्या वळवाच्या पावसाचा दणका द्राक्षांसह फळांना बसला आहे. द्राक्षांची आवक कमी झाल्याने ती प्रतिकिलो ८० रुपयांच्या घरात जाऊन पोहोचली आहेत.
रविवारच्या आठवडी बाजारात लाल मिरची (ब्याडगी)चा प्रतिकिलो दर २२० रुपये, तर जवारी १६० रुपये आहे. यंदा दरामध्ये सुमारे २० टक्के वाढ झाली आहे. चटणी करण्यासाठी लागणाºया साहित्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. मसाल्याच्या विविध साहित्याचे दर १०० रुपयांपासून ते ५०० रुपये आहेत. तसेच शेंगतेल व सरकी तेलामध्ये वाढ झाली आहे. शेंगतेलात चार रुपयांनी वाढ होऊन ते १२४ रुपये प्रतिकिलो, तर सरकीत दोन रुपयांची वाढ होऊन ते ९० रुपये झाले आहे. गेल्या आठवड्यात सरकीमध्ये तब्बल आठ रुपयांची वाढ झाली. बहुतांश ग्राहक सरकी तेल घेतात. या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, दुसरीकडे तांदूळ, गहू, ज्वारी, साखरेचे दर स्थिर आहेत.
भाज्यांची आवक वाढल्याने दरावर परिणाम झाला आहे. टोमॅटो प्रतिकिलो पाच रुपये, गवार २५ रुपये, ओला वाटाणा ४५ रुपये, कारली व भेंडी १५ रुपये, तर मेथीची पेंढी, पालक व शेपूचा दर स्थिर होता.
फळबाजार असा
मोसंबी चुमडे ७०० रुपये, संत्री कॅरेट ८०० रुपये, चिक्कू शेकडा ३०० रुपये, डाळिंब ४५ रुपये किलो, अंजीर ५० रुपये, अननस २० रुपये, तर आंबा (हापूस) ४०० रुपये, तर पायरी २५० रुपये असा बॉक्स होता.
काकडीची आवक वाढली
उन्हाळ्यात कलिंगड, द्राक्षांबरोबर काकडीलासुद्धा ग्राहकांकडून जास्त मागणी असते. गेल्या आठवड्यात काकडीचा दर प्रतिकिलो २० रुपये होता; पण या आठवड्यात काकडीची आवक वाढल्याने त्याचा दरावर परिणाम झाला. ती १५ रुपयांजवळ गेली होती.
लसूण उतरला
दैनंदिन भोजनासाठी नेहमी वापरात असणाºया लसणाच्या दरात उतरण झाली आहे. लसणाचा प्रतिकिलोचा दर २५ रुपये असा होता. त्यामुळे लक्ष्मीपुरीतील आठवडी बाजारात लसूण घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होती.