पित्यानेच रागात कानशिलात लगावल्याने भिंतीवर आपटून चिमुकलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 07:28 PM2020-07-25T19:28:49+5:302020-07-25T19:33:01+5:30
चक्कर येऊन पडल्याने सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालाचा बनाव करणाऱ्या पित्यानेच तिच्या कानशिलात लगावल्याने तिचे डोके भिंतीवर आपटले व तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली.
कोल्हापूर : चक्कर येऊन पडल्याने सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालाचा बनाव करणाऱ्या पित्यानेच तिच्या कानशिलात लगावल्याने तिचे डोके भिंतीवर आपटले व तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली.
या प्रकरणी संशयित पिता तानाजी दिलीप मंगे (वय २९, रा. जयभवानी गल्ली, कसबा बावडा) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. अनन्या तानाजी मंगे (वय ६) असे या दुर्दैवी मृत मुलीचे नाव आहे. शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी ही घटना घडली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, कसबा बावडा येथील जयभवानी गल्लीत दोन महिन्यांपासून राहणारे तानाजी मंगे हे कुटुंबीय ताराबाई पार्क येथील बंगल्यात सुरक्षारक्षकाचे काम करीत होते. अनन्या मंगे ही मुलगी अडीच महिन्यांपूर्वी खेळताना पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर इजा होऊन तिला वारंवार फिट येत होत्या. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी घरातच ती चक्कर येऊन पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ती गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले.
तिला प्रथम शेजारील खासगी व नंतर सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले; पण उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूबाबत शेजारील नागरिक व पोलिसांकडून अनेक शंका व्यक्त केल्या जात होत्या. त्यामुळे घटनेनंतर तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिसरात चौकशी केली.
शनिवारी, शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्मिता पाटील, पोलीस कॉन्स्टेबल तानाजी चौगले, राजू वरक यांनी तपासास सुरुवात केली. अवघ्या तासाभरात खरा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पित्यानेच कानशिलात लगावल्याने अनन्या या मुलीच्या मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला.
पोलिसांनी संशयित वडील तानाजी मंगे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार केल्यानंतर घडलेला सत्य प्रकार त्याने पोलिसांना सांगितला. शुक्रवारी दुपारी तानाजी हा आपली पत्नी, मुलगी अनन्यासोबत येथील दत्तमंदिरात देवदर्शनासाठी गेला होता. दर्शन करून सर्वजण घरी परतले. त्यानंतर अनन्या ही घराच्या परिसरातच खेळत होती.
खेळताना तिला तहान लागल्याने ती पाणी पिण्यासाठी घरात आली; पण वडिलांना (तानाजी) पाहून घाबरत-घाबरत घरात निघाली. त्याने तिला जवळ बोलाविले, त्यावेळी ती आली नसल्याने त्याचा त्याला राग आला. त्याने रागाच्या भरात उठून तिच्या कानशिलात लगावली. त्या धक्क्याने ती भिंतीवर जोरात जाऊन आदळून खाली पडली. त्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
तानाजीने तिला परिसरातील खासगी रुग्णालयात व तेथून सीपीआरमध्ये उपचारासाठी नेले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची त्याने कबुली दिली. शाहूपुरी पोलिसांनी तानाजी मंगे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला शनिवारी दोन दिवसांची कोठडी सुनावली.
अन पोलिसही सुन्न झाले...
दुर्घटनेतील बनवेगिरीबाबत संशय वाटल्याने पोलिसांनी चिमुकलीच्या पित्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली अन् तो माहिती सांगताना मुसमुसून रडू लागला अन् तासभरातच आपणच तिच्या कानाशिलात लगावल्याने त्या धक्क्याने तिचे डोके भिंतीवर आदळले, त्यातच तिचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार त्याने सांगितला. रागाच्या भरात पित्याकडूनच पोटच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याचे सत्य समोर आले व पोलीसही काही वेळ सुन्न झाले.
आईचा हदयद्रावक आक्रोश...
पोटच्या मुलीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजताच मुलीच्या आईने आक्रोश केला. घटना उघडकीस आल्यानंतर ती पतीच्या अंगावर धावून गेली. तिला पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी रोखले.