नावांच्या नोंदीसाठी ‘चिंचेवाडीकर’ पाहताहेत ५६ वर्षे वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:36 AM2020-12-14T04:36:33+5:302020-12-14T04:36:33+5:30
गडहिंग्लज : चिंचेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील सामानगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या स्थलांतरित ग्रामस्थांना पुनर्वसाहतीसाठी दिलेल्या प्लॉटच्या १/१२ पत्रकी नावांच्या नोंदणीसाठी ...
गडहिंग्लज :
चिंचेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील सामानगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या स्थलांतरित ग्रामस्थांना पुनर्वसाहतीसाठी दिलेल्या प्लॉटच्या १/१२ पत्रकी नावांच्या नोंदणीसाठी गेली ५६ वर्षे वाट पाहावी लागत आहे. पुनर्वसनासाठी १९६४ मध्ये जमीन देण्यात आली असून, ४५ लाभार्थी प्लॉटधारकांचा ७/१२ अद्याप कोराच आहे.
प्लॉटधारकांची नावे तत्काळ ७/१२ पत्रकी नोंदविण्यात यावी, अशी मागणी चिंचेवाडी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतचे निवेदन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना शिष्टमंडळाने भेटून दिले.
निवेदनात, चिंचेवाडी गावठाणातील सामानगड किल्ल्याच्या तटालगतची जमीन भूकंपाच्या धक्क्याने खचल्यामुळे तेथील रहिवासी ग्रामस्थांना तत्काळ हलविण्यात आले. त्यानंतर ते आपापल्या शेतात झोपडी बांधून राहत असताना जीवित आणि वित्त यांना धोका निर्माण झाल्यामुळे शासनाने १९६४ मध्ये त्यांच्या पुनर्वसनासाठी रि.स.नं. ४४/१, ४४/२, ४५ पैकी १५३/१ पैकी गट नं. ४०७, ४०८, ४०९ आणि ४४३ मधील आपत्कालीन ४५ प्लॉटचे वाटप करण्यात आले.
प्लॉट दिल्यानंतर ग्रामस्थांनी घरे बांधून आपला रहिवास सुरू केला. प्लॉटधारक ग्रामपंचायतीस घरफाळा भरतात; परंतु, अद्याप ७/१२ पत्रकी प्लॉटधारकांच्या नावांच्या नोंदी नाहीत. त्यामुळे तातडीने त्यांच्या नोंदी करून स्वतंत्र ७/१२ उतारे द्यावेत.
शिष्टमंडळात माजी सभापती अमर चव्हाण, रामाप्पा करिगार, विकी कोणकेरी, सर्जेराव कदम, अर्जुन सुतार, अप्पा घेवडे, अप्पा कणकुले, स्वप्निल कोरे, सुरेश घेवडे, दत्ता कणकुले, महादेव सुतार, धोंडीबा चौगुले, बाबूराव सावंत, शैलेश कणकुले, आदींचा समावेश होता.
------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देताना अमर चव्हाण. शेजारी रामाप्पा करिगार, सर्जेराव कदम, अप्पा कणकुले, सुरेश घेवडे, महादेव सुतार, आदी उपस्थित होते.
क्रमांक : १३१२२०२०-गड-०८