चिंचवाडकरांना मिळाली दिवाळीची अनोखी भेट
By admin | Published: November 14, 2015 12:19 AM2015-11-14T00:19:55+5:302015-11-14T00:20:22+5:30
पेयजल योजनेचे उद्घाटन : पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावकऱ्यांना शुद्ध पाणी
संतोष बामणे- जयसिंगपूर -चिंचवाड (ता. शिरोळ) येथील गेल्या पाच वर्षांपासून राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम संथगतीने सुरू होते. मात्र, पाण्याच्या टाकीच्या जागेचा वाद संपुष्टात येत काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. चिंचवाड व हाळचिंचवाडमधील नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी मिळाले. यामुळे पाच वर्षांची शुद्ध पाण्याची प्रतीक्षा संपली आहे. दिवाळी-पाडव्यादिवशी पेयजल योजनेचे उद्घाटन झाले.चिंचवाड हे कृष्णा नदीकाठावरील गाव असून, या गावची लोकसंख्या पाच हजारांहून अधिक आहे. या ठिकाणी जुनी मोडकळीस आलेली पाणीपुरवठा योजना कार्यरत आहे. तसेच जलशुद्धिकरण यंत्रणा नसल्यामुळे गावाला अशुद्ध पाणीपुरवठा होतो. ग्रामपंचायतीकडून पाण्यात शुद्धिकरण पावडर टाकूनही ते स्वच्छ होत नव्हते. पावसाळ्यात आरोग्याचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर येत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. २०१० साली तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या पाठपुराव्यामुळे गावाला राष्ट्रीय पेयजल योजना मंजुरी झाली होती. यासाठी एक कोटी ५९ लाखांचा निधी गावाला उपलब्ध झाला.
योजना उभारण्यासाठी ग्रामपंचायतीकडे राखीव जागा उपलब्ध नसल्यामुळे अडचणी येत होत्या. चिंचवाड-शिरोळ रस्त्यालगत सहा गुंठे जागा ग्रामपंचायतीने विकत घेऊन त्याठिकाणी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. २०१२ साली प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. या-ना त्या कारणाने काम संथगतीने सुरू होते. गावातील नेत्यांनी एकत्र येऊन काम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला. सध्या पेयजल योजनेच्या चिंचवाडात व हाळचिंचवाड येथे ६५ हजार लिटरच्या दोन अद्ययावत टाक्या उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे हाळचिंचवाडमधील पाण्याचा प्रश्न निकालात निघाल्याने समाधान व्यक्त होत आहे. काम शंभर टक्के पूर्ण झाले असून उद्घाटन उत्साहात झाले.
ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय पेयजल योजना पूर्ण झाली असून, सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधून गावाच्या विकासात राजकारण नको अशी ठाम भूमिका घेऊन हा रेंगाळलेला प्रश्न सोडवून गावाच्या विकासात चालना देण्याचे काम केले असून आता गावाला शुद्ध पाणी उपलब्ध झाले आहे.
- प्रमोद चौगुले,
ग्रामपंचायत सदस्य, चिंचवाड
गेल्या पाच वर्षांपासून चिंचवाड पेयजल योजनेचा प्रश्न संथगतीने सुरू होता. मात्र, गावच्या विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे जाऊन पदाधिकाऱ्यांनी काही अडचणी होत्या त्या दूर करून राष्ट्रीय पेयजल योजनेचा प्रश्न निकाली काढला आहे.
- प्रेमानंद उदगावे, सामाजिक कार्यकर्ते, चिंचवाड.