चिपरीत नऊ वर्षांपासून मोफत आरोग्य सेवेचा वसा- जीवनदीप आरोग्य सेवा संस्था : रणजित आवळे, विजय कांबळे या दोन तरुणांचा प्रेरणादायी उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:27 AM2018-01-17T00:27:15+5:302018-01-17T00:28:12+5:30
उदगाव : शिरोळ तालुक्यातील चिपरी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने जयसिंगपूर येथे उपचारासाठी जाणे सर्वसामान्य लोकांना परवडत नाही.
संतोष बामणे ।
उदगाव : शिरोळ तालुक्यातील चिपरी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने जयसिंगपूर येथे उपचारासाठी जाणे सर्वसामान्य लोकांना परवडत नाही. त्यामुळे एक पाऊल पुढे येऊन रणजित आवळे व विजय कांबळे या दोन युवकांनी जीवनदीप आरोग्य सेवा संस्थेची स्थापना करून ते गेल्या नऊ वर्षांपासून चिपरीच्या नागरिकांना मोफत आरोग्य सेवा व औषधे देत आहेत. ग्रामीण भागात ही संस्था चिपरीकरांना आधारवड बनली आहे.
सध्या होत असलेल्या आजारांमुळे अनेक रुग्णांना उपचार मिळत नाहीत. आर्थिक अडचणींमुळे रुग्ण दगावतात. याचा अनुभव घेऊन रणजित आवळे व विजय कांबळे यांनी २००८ साली जीवनदीप आरोग्य सेवा संस्थेची स्थापना केली. चिपरी येथील बस थांब्याजवळच मोफत दवाखाना केंद्र आहे. नागरिकांना चांगली व विनामूल्य आरोग्यसेवा मिळावी यासाठी या संस्थेत रुग्णांची ताप, सर्दी, खोकला, पोटदुखी, गुडघेदुखी आजारांची तपासणी करून औषधे दिली जातात. आठवड्यातून सोमवार, बुधवार, शुक्रवार व रविवारी हे चार दिवस दवाखान्याची सोय आहे.
डॉ. सुरेश पाटील (जयसिंगपूर), डॉ. मिलिंद कोलप (डॉ. जे. जे. मगदूम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज), डॉ. मिलिंद सांवत (मिरज) यांच्याकडून रुग्णांची तपासणी केली जाते. आठवड्यात १५० हून अधिक रुग्ण आरोग्य सेवेचा लाभ घेतात. तर याच संस्थेकडून शिरोळ, हातकणंगले, कागल, पन्हाळा व करवीर तालुक्यांत आरोग्य सेवकांद्वारे काम सुरू आहे.
मार्गदर्शन व विविध सेवा
रक्तदान शिबिर, सर्वरोग निदान शिबिर, डोळे तपासणी, वृक्षारोपण, सामाजिक प्रबोधन याबरोबरच एच.आय.व्ही. व क्षयरोगांवर मार्गदर्शन केंद्रांतून सेवा दिल्या जातात. गरजूंना मोफत रक्तपुरवठाही केला जातो. मणक्याचे संसर्ग, कॅन्सर, हृदयरोग, मेंदू यांसह विविध आजारांच्या चिपरीतील रुग्णांना मोफत व शासकीय लाभातून सेवा देण्याचे काम ही संस्था करते.
माणसांच्या जिवासाठी प्रयत्न
नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे गोरगरीब रुग्णांना चांगले उपचार घेता येत नाहीत. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन माणसांच्या जिवासाठी काहीतरी चांगले करावे, यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहोत. लवकरच दहा बेडचे रुग्णालय सुरू करण्याचा आमचा संकल्प आहे. तो सामाजिक कार्यातून लवकरच पूर्ण करणार असल्याचे रणजित आवळे व विजय कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.