चिपीतील विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचेच

By admin | Published: November 5, 2015 09:53 PM2015-11-05T21:53:33+5:302015-11-05T23:57:12+5:30

डिसेंबर २०१६ मध्ये सुरू करणार : आयआरबी कंपनीचे प्रकल्प अधिकारी राजेश लोणकर यांची माहिती

Chipi Airport is of international standards | चिपीतील विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचेच

चिपीतील विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचेच

Next

कुडाळ : चिपी-परुळे येथील सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड हे विमानतळ लहान नाही, तर आंतरराष्ट्रीय दर्जाचेच बनणार असून, डिसेंबर २०१६ मध्ये पहिले विमान उतरून याठिकाणी विमानसेवा सुरू होणारच, अशी माहिती विमानतळाचे काम करणाऱ्या आयआरबी कंपनीचे प्रकल्प अधिकारी राजेश लोणकर यांनी दिली आहे. तरीही सद्य:स्थिती पाहता या विमानतळाचे काम अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे.या विमानतळाचे काम २०१३ मध्ये आयआरबी कंपनीने सुरू केले. २७६ हेक्टरचा परिसर असलेल्या या विमानतळाची सुरुवात झाली खरी, मात्र अनेक वादविवाद तसेच शासनाच्या जाचक अटींमध्ये या प्रकल्पाचे काम सुरू झाले. त्यामुळे दोन वर्षांत खरे तर हे काम पूर्ण होण्यापेक्षा ते चार वर्षे झाली तरी पूर्ण झालेले नाही. विमानतळाचे काम हे अंदाजपत्रकानुसार ३५० कोटी रुपयांचे आहे. सद्य: पावसाळ्यात काम धिम्यागतीने असून, पावसानंतर गती वाढविल्यास पुढील वर्षापर्यंत विमानतळाचे काम पूर्ण होईल.

वैशिष्ट्ये--सर्वांत मोठी म्हणजे ३४५० मीटर (साडेतीन किलोमीटर)ची धावपट्टी याठिकाणी होणार आहे.
एकाचवेळी तीन मोठी व दोन लहान अशी पाच विमाने पार्किंगची सोय असणार आहे.विमानासाठी लागणारा पेट्रोल पंप असणार आहे. विमानांची दुरुस्ती, मेंटेनन्स, आॅपरेशन या सेवा इथे निर्माण करायचा दृष्टिकोन आयआरबी कंपनीचा आहे.
प्रवासी इमारत, एअर वाहतूक नियंत्रण कक्ष, तंत्रज्ञ इमारत व अ‍ॅडमिन इमारतीही येथे सुसज्ज व अद्ययावत असणार आहेत.


६० टक्के काम पूर्ण---सद्य:स्थितीत किती काम पूर्ण झाले, त्याची माहिती विचारली असता आयआरबी सूत्रांकडून सांगण्यात आले की, धावपट्टीचे काम सुमारे ७० टक्के पूर्ण झाले असून तो आंतरराष्ट्रीय दर्जाचाच असणार आहे. येथील विमानतळ लहान करण्याचा कंपनी आणि शासनाचा कोणताच मनसुबा नसून, मंजूर असल्याप्रमाणेच हा विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचा असणार असल्याची माहिती आयआरबी कंपनीने दिली.

मोपा विमानतळाशी काहीही संबंध नाही
मोपा येथील होणाऱ्या विमानतळामुळे येथील विमानतळ हे लहान करण्यात येणार असल्याची माहिती पसरत आहे. मात्र, यामध्ये तथ्य नसून या विमानतळाशी मोपा विमानतळाचा काहीही संबंध नाही. कारण हे महाराष्ट्र राज्यातील विमानतळ असून, मोपा विमानतळाची मंजुरीची प्रक्रिया अजूनही सुरू आहे.



जूनमध्ये होणार ट्रायल--पावसाळ्यानंतर या विमानतळाच्या कामाला गती देण्यात येणार असून, जून २०१६ पासूनच याठिकाणी ट्रायल म्हणून विमाने उतरतील व उड्डाणही करतील.


डिसेंबरमध्ये सुरू होणार : लोणकर
हे विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे असणार असून, २०१६ मध्ये या विमानतळाचे सर्व काम पूर्ण होऊन डिसेंबर २०१६ मध्ये वाहतुकीसाठी खुले राहणार असल्याची माहिती आयआरबीचे प्रोजेक्ट मॅनेजर राजेश लोणकर यांनी दिली.


मालवाहतूकही
सुरू होणार
या विमानतळाचे काम करणाऱ्या आयआरबी कंपनीकडे हे विमानतळ ९५ वर्षे बीओटी तत्त्वावर राहणार असून, जिल्ह्यातील फळे व इतर वस्तू परदेशी वाहतूक करण्याकरिता विमान मालवाहतूकही सुरू करण्याचा निर्धार आयआरबी कंपनीने केला आहे.

आमच्या दृृष्टीने कामाची
गती चांगली
विमानतळाचे काम सुरू केल्यानंतर गौण खनिजबंदीमुळे येथील काम हळू झाले. तसेच दरवर्षी चार महिने पडणाऱ्या धुवाँधार पावसामुळे २०१३ ते २०१५ या तीन वर्षांतील सरासरी काढली असता सुमारे एक वर्ष पाऊस व गौण खनिजाच्या बंदीमुळे काम अत्यंत धिम्यागतीने सुरू होते. असे असले तरी या विमानतळाच्या कामाची गती अत्यंत चांगली अशीच आहे, असेही आयआरबीकडून सांगण्यात आले.



इतर राज्यांनाही फायदा
या विमानतळावर विमाने पार्किंग करणे, दुरुस्ती मेंटेनन्स व पेट्रोल पंप अशा सुविधा असल्याने याचा फायदा इतर राज्यातील विमानतळांना होणार आहे. कारण गोवा-दाभोली येथील विमाने पार्किंगसाठी बंगलोर येथे जातात. ती येथे येतील. तसेच मेंटेनन्स व इतर सोयी-सुविधांकरिताही इतर राज्यांतील विमाने याच ठिकाणी येण्याची शक्यता असल्याने या विमानतळाचा फायदा इतर राज्यांनाही होणार आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाची धावपट्टी
महाराष्ट्रातील शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी २५०० मीटर एवढी आहे. त्यापेक्षा जास्त म्हणजेच ३४५० मीटर धावपट्टी चिपी विमानतळाची असल्याने याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची धावपट्टी तयार असणार असून, मोठी विमानेही येथे उतरणार आहेत.

Web Title: Chipi Airport is of international standards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.